उल्हास नदीच्या पूर परिस्थिमुळे बारवी डॅमचे स्वंयचलित दरवाजे उघडणार, कार्यकारी अभियंत्याचे तहसीलदारांना महत्त्वाचे पत्र

ठाणे,२७ जुलै २०२३ : ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये धुवाधार पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूरसदृश्य परिस्थिती आहे. असे असताना आता बदलापूरमध्ये असणारे बारवी धरणदेखील जवळपास धोक्याच्या पातळीपर्यंत भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडणार आहेत आणि बारवी नदीत पाण्याचा विसर्ग होणार आहे. बारवी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता दुशांत उईके यांनी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी तालुक्याच्या तहसीलदारांना पत्र पाठवले आहे. या पत्रात बारवी धरणातून बारवी नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत माहिती देण्यात आली आहे.

२६ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ४ वाजता धरणाची पातळी ७०.५० मी. एवढी वाढली असून बारवी धरणातील संभाव्य पाण्याची आवक यामुळे पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. बारवी धरणावरती ११ स्वयंचलित वक्रद्वारे बसविण्यात आलेले आहेत. त्याची विसर्ग पातळी ७२.६० मी. इतकी आहे. बारवी धरणाची पाणी पातळी ७२.६० मी. पातळीवर गेल्यानंतर स्वयंचलित वक्रद्वारे आपोआप उघडून पाण्याचा विसर्ग सुरु होईल. तसेच पाणी पातळी ७२.६० मी. पातळीपेक्षा खाली गेल्यांनतर स्वयंचलित वक्रद्वारे आपोआप बंद होऊन पाण्याचा विसर्ग थांबेल, असे पत्रात म्हटले आहे.

सद्यस्थितीतील चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे उल्हास नदीत पूर परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करणे शक्य होत नसल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. या सर्व बाबींचा विचार करता धरणाची पाणी पातळी कधीही ७२.६० मी. पातळी गाठून स्वयंचलित वक्रद्वारे आपोआप उघडून बारवी धरणातून बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु होऊ शकतो, असा इशारा पत्रातुन देण्यात आला आहे.

याबाबतचा इशारा नदीकाठच्या शहरांना आणि गावांना देण्यात आला आहे. बारवी नदीच्या तिरावरील विशेषत: अस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, कारंद, मोऱ्याचापाडा, चोण, रहाटोली आणि नदी काठावरील इतर शहरे व शहरातील सरकारी यंत्रणा तसेच गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी गांवातील नागारिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याबाबत सतर्कतेच्या सूचना देण्याची विनंती आहे. तसेच या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरिकांना आणि पर्यटकांना प्रवेश न करण्याबाबत तसेच नदीच्या पात्रात पोहण्यास मज्जाव करणेबाबत सूचना आपल्या स्तरावरुन देण्यात याव्यात ही विनंती व आवाहन या पत्रात करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा