सोलापूर, ६ ऑगस्ट २०२० : सोलापूर जिल्ह्यातील शेती, उद्योग व व्यवसाया बरोबरच सर्व नागरिकांचे लक्ष लागून असलेल्या उजनी धरणामध्ये चालू वर्षी पाण्याची आवक येत नव्हती. परंतू, पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर उशिरा का होईना पण दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणे लवकर भरतील अशी आशा निर्माण झाली आहे. ही धरणे भरल्यानंतर या धरणातील पाणी उजनीत सोडले जाते व याचा फायदा उजनी धरणाला होतो.
तीन ते चार दिवस झाले पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पडत असलेल्या पावसाने इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. बंडगार्डन धरणातील पाणी साठा मोठ्या प्रमाणात वाढल्याने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम म्हणून बंडगार्डनचा विसर्ग १७,७५० क्यूसेकने पाणी उजनीत येत आहे.
उजनी धरण गेल्यावर्षी आजच्या दिवशी १०० टक्के होते. दौंडमधून विसर्ग सुमारे दोन लाख २१ हजार ७६ क्यूसेकनी येत होता. त्यामुळे गेल्या वेळी ऑगस्ट महिन्यात उजनी धरण १००% भरून पाणी भीमा नदीत द्वारे सोडून द्यावे लागले होते. परंतु, चालू वर्षी पुणे जिल्ह्यात सुरुवातीला पाऊस न पडल्यामुळे जलाशय परिसरात पाऊस पडत राहिल्यामुळे पाण्याची वाढ ही संथ गतीने होत आहे. १४ जुलैला उजनी धरण मायनस १.९४ टक्के होते. २० जुलैला धरण प्लस मध्ये आले तेव्हा पासून म्हणजे सतरा दिवसात धरण १७ टक्के झाले आहे. म्हणजे सरासरी रोजचा एक टक्का पाणीसाठा उजनी धरणात वाढताना दिसून येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील