पुणे, ४ ऑगस्ट २०२३ : शिक्षणामुळे जीवनाला नवीन दिशा मिळते. त्यामुळे प्रत्येक पालक आपल्या मुलांना अतोनात काबाडकष्ट करून शिकवण्यासाठी प्रयत्न करतात. मुलेही आपले उज्वल भवितव्य घडण्याच्या दृष्टीने मन लावून शाळा शिकतात. परंतु महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणाचा प्रवास हा जीवघेणा दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुकाही याला अपवाद नाही. या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना नदीतून आपला जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे.
पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या घिसर ते हिरवेवस्ती दरम्यान कानंदी नदीवर पूल नसल्याने या ठीकाणच्या, शाळकरी मुलांना गुडघाभर पाण्यातून धोकादायकरित्या प्रवास करून शाळेत जावे लागत आहे. अनेकदा पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यावर पाण्याचा प्रवाह तीव्र असतो. त्यामुळे अनेक दिवस विद्यार्थ्यांना घरीच बसाव लागत आहे. शाळेत येण्या-जाण्यासाठी ग्रामस्थांना दररोज विद्यार्थ्यांना अंगा खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागते आहे.
त्यानंतर विद्यार्थ्यांना पावसात दोन ते तीन किलोमीटर अंतर डोंगरदऱ्यातून, चिखल, काट्यातून वाट काढत जीव धोक्यात घालून प्रवास करत शाळेत पोहचाव लागत आहे. त्यामुळे नदीवर पूल बांधण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे. मात्र गेली अनेक वर्ष शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. गरोदर स्त्रियांना, वयस्कर गृहस्थ, लहान मुलांना रस्ता, पुल आणि कुठल्याही प्रकारची सोय नसल्यामुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे तात्काळ याठिकाणी पूल बांधावा अशी मागणी आता जोर धरत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर