पुरंदर, १ जानेवारी २०२१: राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत.
गावातील अनेक उमेदवार निवणुकीच्या माध्यमातून गाव कारभारी होऊ पाहत आहे. मात्र, याचा फायदा घरपट्टी वसुलीसाठी झाल्याचे पाहायला मिळत आहे. नीरा ग्रामपंचायतीकडे काल अखेर सुमारे दहा लक्ष रुपयाची घरपट्टी वसूल झाल्याची माहिती ग्रामसेवक मनोज ढेरे यांनी दिली आहे.
ग्रामपंचायतीच्या चुकीच्या कामावर बोठ ठेवणारे अनेकजण आहेत. पाणी आलं नाही तर बोलणारे आहेत. पण, हेच लोक ज्यावेळी घरपट्टी किंवा पाणी पट्टी भरायची असते तेव्हा त्याकडे सरळ दुर्लक्ष करतात आणि आपला याच्याशी काही संबंध नसल्याचे दाखवतात.
खरतर ग्रामपंचायतीचा मोठा खर्च हा येणाऱ्या घरपट्टी व पाणीपट्टीतून होत असतो. घरपट्टी वसूल करणे म्हणजे एक प्रकारचे अग्नी दिव्यच असते. मात्र, ग्रामपंचायतीची निवडणूक आली की, भावी उमेदवार आपली घरपट्टी न सांगता भरतात. नीरा ग्रामपंचायतीसाठी ८८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामूळे या पंधरा दिवसात चक्क १० लक्ष २९ हजार६०५ रुपये इतकी घरपट्टी पाणीपट्टी व गाळा भाडे इत्यादीची वसूल झाली आहे. एकूण थकबाकीच्या. ती ५ टक्के आहे. तर वार्षिक घरपट्टी च्या २५ टक्के घरपट्टी वसूल झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी ग्रामपंचायतीची कोणतीही थकबाकी असलेली चालत नाही. त्यामूळे निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारांनी ही पट्टी भरल्याने वसुली झाली आहे. मागील वर्ष भरात गावात ३१,९६,३५७ रुपयाची वसुली झाली. मात्र, निवडणुकीमुळे पंधरा दिवसांत ९,३४,६०५ रुपये इतकी विक्रमी घरपट्टी, पाणीपट्टी तर ९५,००० रुपये गाळा भाडे वसूल झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे