घाऊकमध्ये पन्नास पैसे, तर किरकोळ बाजारात रुपयाला एक लिंबू
पिंपरी-चिंचवड, ता. ८ डिसेंबर २०२२ : बाजारात दिवसेंदिवस लिंबाची आवक वाढत असून, मागणीच्या तुलनेत ही आवक अधिक असल्याने दरात मोठी घट झाली आहे. घाऊक बाजारात एका लिंबाची किंमत चाळीस ते पन्नास पैसे, तर किरकोळ बाजारात एका लिंबाला एक रुपया दर मिळत आहे. त्यामुळे मिळणार्या दरातून शेतकर्यांचा वाहतूक खर्चही निघत नसल्याने लिंबू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणच्या बाजारांत मिळून रोज सुमारे दोन ते तीन हजार गोणींची आवक होत आहे. एका गोणीत प्रतवारी, तसेच आकारमानानुसार तीनशे ते साडेचारशेच्या जवळपास लिंबू असतात. लिंबांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, ग्राहकांकडून लिंबांना मागणी नाही; तसेच घटलेल्या दरामुळे मात्र लोणचे उत्पादकांकडून कमी किमतीत लिंबांची खरेदी केली जात आहे. लोणचे उत्पादकांकडून अधिकच्या किमतीत माल खरेदी केला जात नसल्याने लिंबू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. एकीकडे तोडणीला आलेल्या लिंबांचे काय करायचे? असा प्रश्न आहे, तर दुसरीकडे बाजारात कवडीमोल किमतीत लिंबू विकावे लागत आहेत.
उत्पादन खर्चही निघणे अवघड
शेतकऱ्यांवर कायम संघर्ष करण्याची वेळ येत असते. कारण कोणतेही उत्पादन घेतले की त्याला भाव मिळेलच, असे कधी होत नाही. सद्य:स्थितीत मिळणार्या दरातून शेतकर्यांना वाहतूक खर्च, लिंबाची तोडणी, उत्पादन खर्च भागविणे कठीण झाले आहे. वाढलेली लिंबांची आवक आणि थंडीमुळे ग्राहकांकडून घटलेल्या मागणीमुळे सद्य:स्थितीत शेतकर्यांना लोणचे उत्पादकांवरच अवलंबून राहावे लागत आहे. आगामी दीड ते दोन महिन्यांनंतर लिंबाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
- महादेव जाधव, शेतकरी.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील