रिक्षा संपामुळे दैनंदिन बसव्यतिरिक्त शंभर जादा बस पुण्यात दाखल

पुणे, १ डिसेंबर २०२२ : रिक्षा संघटनांनी २८ नोव्हेंबरला रिक्षा बंद पुकारला. रिक्षा संघटनांनी बेमुदत संप पुकारल्याने ‘पीएमपीएल’ने दैनंदिन सुरू असलेल्या बसव्यतिरिक्त शंभर जादा बस पुणे, पिंपरी-चिंचवडमधून सोडल्या. सोमवारी १,७४० बस पुण्यात सुरू होत्या. दररोज रिक्षाने प्रवास करणारे अनेक प्रवासी आता बसने प्रवास करू लागले आहेत. आणि त्यामुळेच रिक्षा संघटनांनी पुकारलेल्या बंदचा फायदा प्रशासनाला झाल्याचे स्पष्ट होत आहे.

‘पीएमपीएल’ने सोमवारी सर्वाधिक म्हणजेच १५ लाख ४७ हजार ९४६ प्रवासांनी प्रवास केल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे पीएमपीएल स्थापन झाल्यापासूनचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. प्रवाशांनी मोठ्या संख्येने बसमधून प्रवास केल्याने तिकीट विक्रीतून १ कोटी ९२ लाख ८ हजार ९६८ रुपये उत्पन्न ‘पीएमपीएल’ला मिळाले. त्याचप्रमाणे पास विक्रीतून १२ लाख ६२ हजार ७५५ रुपये उत्पन्न मिळालं असून, एकूण २ कोटी ४ लाख ७८ हजार ७२३ रुपये ‘पीएमपीएल’ने मिळविले.

दैनंदिन प्रवासी संख्या व दैनंदिन उत्पन्नामध्ये झालेली वाढ ही प्रवाशांनी ‘पीएमपीएल’च्या बसवर दाखवलेला विश्वास आहे. रिक्षा बंद असल्याने बसमधून प्रवास करण्याचा निर्णय प्रवाशांनी ‘पीएमपीएल’च्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ केलेली दिसून येते. याआधी देखील १४ नोव्हेंबर २०२२ आणि ४ जानेवारी २०१६ रोजी दोन कोटी रुपयांचे दैनंदिन उत्पन्न पार करण्यात पीएमपीएल प्रशासनाला यश आले होते. प्रवाशांची संख्या वाढल्याने पीएमपीएलच्या पर्यावरणपूरक स्मार्ट एसी इलेक्ट्रिक बस आणि सीएनजी बसचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पीएमपीएल प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा