गुवाहाटी, ५ जानेवारी २०२३ : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या विमानाचे बुधवारी रात्री गुवाहाटीमध्ये इमरजेंसी लॅडींग करण्यात आले आहे. कमी दृश्यमानतेमुळे अमित शहा यांचे विमान गुवाहाटीच्या गोपीनाथ बोरदोलोई अंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवले गेले.
संबधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा आगरतळाला जाणार होते, पण दाट धुक्यामुळे विमान आगरतळा विमानतळावर उतरू शकले नाही. यामुळे विमान गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे.
- आजपासून ‘जन विश्वास’ यात्रेस होणार सुरुवात
अमित शहा आज त्रिपुरात भाजपच्या रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवणार असून, आठ दिवस चालणाऱ्या या यात्रेला उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील धर्मनगर येथून सुरुवात होणार आहे. या रथयात्रेचे नाव ‘जन विश्वास यात्रा’ असे ठेवण्यात आले असून, १२ जानेवारीला या यात्रेचा समारोप कार्यक्रम असून यामध्ये भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
दरम्यान, अमित शहा यांचे रात्री उशिरा गुवाहाटीच्या एलजीबीआय विमानतळावर आगमन झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वागत केले. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा बुधवारी रात्री त्रिपुराला जाणार होते. ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, आता कार्यक्रमात बदल होण्याची शक्यता आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.