मुसळधार पावसामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यात पूर, बचाव कार्य सुरू

9

विदर्भ, ३१ ऑगस्ट २०२०: विदर्भातील मुसळधार पावसामुळे विदर्भातील अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नागपूर, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना एयरलिफ्ट केलं जात आहे. याच बरोबर नागपूर जिल्ह्याला देखील पुराचा चांगलाच तडाखा बसला आहे. पुण्याहून एनडीआरएफची ४ पथके आणि तीन बोटी नागपूरच्या दिशेने रवाना झाली आहेत. याबाबतची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

पुण्याहून रवाना झालेली एनडीआरएफची ही पथके भंडारा आणि ब्रह्मपुरीत बचावकार्यासाठी पोहोचत आहेत. याच बरोबर एस डी आर एफ ची पाच पथके देखील भंडारा जिल्ह्याकडे रवाना झाली आहेत. या बचावकार्या अंतर्गत कालपर्यंत नागपुरात १४,००० पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यात आलं आहे.

भंडाऱ्यात मुसळधार पाऊस पडत असून वैनगंगेने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. गडचिरोलीत सुद्धा गोसेखुर्द प्रकल्पातून देखील पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. यामुळे विदर्भातील या चारही जिल्ह्यांना पुराचा चांगलाच तडाखा बसला आहे. नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे आता इमारतींमध्ये व घरांमध्ये पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यात येत आहे. चंद्रपूर मधील जिल्हाधिकाऱ्यांनी देखील नागरिकांना एयरलिफ्ट करण्याची मागणी केली होती आणि या मागणी अंतर्गत येथील पुरग्रस्त लोकांना एयरलिफ्ट करुन सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी