तुळजाभवानीच्या ७१ प्राचीन नाण्यांसह ऐतिहासिक खजिन्यावर डल्ला

तुळजापूर, १२ सप्टेंबर २०२० : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणा-या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापकासह अन्य दोषी अधिका-यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश मंदिर संस्थांनचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

तुळजाभवानी मातेला निझाम, मोगल सम्राट औरंगजेब, पोर्तुगीज, यांच्या बरोबरच बिकानेर, उदयपूर,लखनऊ,बडोदा आणि इंदोरच्या घराण्यातील राजे महाराजे यांनी त्यांच्या त्याकाळातील चलनातील पुरातन नाणी देवी चरणी अर्पण केली होती. या नाण्यांची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये १९८० पर्यंत होती.

मात्र २००५ व २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन ७१ नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकारांची दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते. तुळजाभवानी मातेच्या खजिन्यातील ७१ ऐतिहासिक व पुरातन नाण्यांसह मौल्यवान वस्तू गायब असल्याची तक्रार पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्या कडे ९ मे २०१९ रोजी केली होती.

सदर तक्रारीनंतर दीपा मुंडे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एक चौकशी समिती नेमली होती. आणि अखेर या प्रकरणात दोषींवर फौजदारी करण्याचे आदेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा