नवी दिल्ली, दि. ९ जून २०२० : कोविड -१९ च्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. कोविड -१९ च्या या संकटाच्या काळात देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण जवळपास दुपटीने वाढले आहे. या काळामध्ये देशांमध्ये १६ लाख सायबर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
जानेवारी महिन्यापासून ते आत्तापर्यंत म्हणजेच गेल्या चार महिन्यात हे गुन्हे नोंदवले गेले आहेत. यामध्ये जानेवारीपासून ते एप्रिल पर्यंत १२ लाख बनावट हाय रिस्क कोविड डोमेन बनवण्यात आले आहे. तसेच या चार महिन्यात १६ लाख क्राईम गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एकीकडे कोरोना व्हायरस संकट आणि दुसरीकडे आता या हॅकरचे संकट देशासमोर उभे आहे.
हे सायबर हल्ले प्रामुख्याने वैद्यकीय संस्था, बँका, इतर वित्तीय संस्था, छोट्या छोट्या कंपन्या, सहकारी संस्था यांना लक्ष करून करण्यात आले आहेत. यामध्ये वैद्यकीय सेवांशी निगडित वेबसाईट तसेच पैशांची देवाण-घेवाण होणाऱ्या बँकांच्या वेबसाईट प्रामुख्याने केंद्रित केल्या गेल्या आहे. आरोग्य सेवेशी संबंधीत वेबसाईट मधून कोविड -१९ च्या विषयात अफवा पसरवणे, लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवणे यांसारखी कामे करण्यात आली.
कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे जवळपास सर्वच कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा आदेश दिला आहे. या दरम्यान मोठ्या कंपन्यांपासून ते छोट्या कंपन्यांमधील सर्वच कर्मचारी घरून काम करत असताना इंटरनेटचा सर्वात जास्त वापर करण्यात आला. अचानक वर्क फ्रॉम होम आल्यानंतर कोणतेही अँटी व्हायरस किंवा मालवेअर प्रोटेक्शन सॉफ्टवेअर नसल्याने धोका आणखी वाढला. एकंदरीत इंटरनेटवरील वाढलेला हा ताण पाहता हॅकर्सने याचा फायदा घेतला.
न्यूज अनकट प्रतिनिधी