रावण दहनाच्यावेळी लोकांच्या अंगावर पडला रावणाचा जळता पुतळा

हरियाणा, ६ ऑक्टोबर २०२२ : एकीकडे सर्वत्र उत्साहात दसरा साजरा होत असतानाच विजयादशमीच्या दिवशी हरियाणामध्ये भयंकर दुर्घटना घडली आहे. रावणदहनात रावणाचा पेटता पुतळा गर्दीवर कोसळला. हे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हरियाणाच्या यमुनानगरमधील ही घटना आहे. भल्या मोठ्या रावणाचा पुतळा पेटवण्यात आला. पुतळा जसा जळला तसा तो खाली कोसळला. तिथेच खाली लोक रावणदहन केल्याचा आनंद व्यक्त करत होते. सर्वजण उत्साहात होते. या गर्दीवरच हा पेटता रावण कोसळला.

एएनआयने ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, यमुनानगरमध्ये दसऱ्यादिनी रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथे रावण, मेघनाथ आणि कुंभकर्ण यांचा पुतळा बनवून जाळण्यात आला. अचानक रावणाचा पेटलेला पुतळा लोकांच्या गर्दीवर पडला. हा ७० फुटी पुतळा लोकांच्या अंगावर पडल्याने सात जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेत नेण्यात आले. लोकांवर पुतळा पडल्याचे पाहून चेंगराचेंगरीचे वातावरण निर्माण झाले, त्यानंतर पोलीस कर्मचार्‍यांना लोकांना बाहेर काढावे लागले. दरम्यान, जमावात अपघातानंतर घबराट आणि भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.

दहनाआधीच कोसळला रावणाचा पुतळा

तर दुसरीकडे हरियाणाच्याच फतेहाबादमध्ये दहनाआधीच पुतळा कोसळला. पुतळा क्रेनने उचलत असताना मध्येच तुटला आणि तो जमिनीवर पडला. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने कसाबसा पुतळा पुन्हा उभा करण्यात आला आणि तो जाळण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा