कर्तव्य पहिले, वाढदिवस नंतर” असे म्हणत पुणे अग्निशमन दलाच्या जवानाची तत्परता

पुणे, २९ जुलै २०२३: आज पहाटे कोंढवा कौसरबाग येथे आगीची घटना घडली होती. यावेळी अग्निशमन दलाकडून कोंढवा बुद्रुक आणि कोंढवा खुर्द येथील फायरगाड्या प्रथम रवाना करण्यात आल्या होत्या. या ठिकाणी एक छोटे गोडाऊन आणि गॅरेज होते. आगीचे मोठे स्वरूप पाहता अतिरिक्त अग्निशमन वाहने ही दाखल झाली होती. दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे आग इतरत्र न पसरता धोका टळला आणि आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले.

या सर्व घटनेवेळी कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्रातील जवान दशरथ माळवदकर यांचा आज ५४ वा वाढदिवस असून ते अग्निशमन दलात गेली २२ वर्ष सेवा बजावत आहे. ते आज सकाळच्या ड्युटीला जाताना कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण करीत आज सुट्टी घेण्याचा आग्रह केला असता त्यांनी कर्तव्य पहिले वाढदिवस नंतर म्हणत ड्युटी बजावण्यासाठी घरा बाहेर पडले.

कारण त्यांना कोंढवा येथील आगीची घटना समजली होती. आपण सुट्टी न घेता आगीच्या वर्दीवर जाणे हे त्यांनी गरजेचे समजून तत्परतेने ड्युटीवर जाऊन आपले कर्तव्य बजावले. घटनास्थळी असलेले अग्निशमन अधिकारी समीर शेख, पंकज जगताप, सुनिल नाईकनवरे, कैलास शिंदे आणि इतर जवानांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अग्निशमन दलाचे जवान नेहमीच आपल्या कर्तव्याला महत्त्व देत कामगिरी चोख बजावतात.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा