नागपूर, २३ जुलै २०२३ : राज्यातील कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांसाठी महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विभागातर्फे ई-मीटिंग सेवा सुरू करण्यात आली आहे. याद्वारे देश-विदेशातील कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलवर बोलता येणार आहे. कारागृह विभागाचे एडीजी अमिताभ गुप्ता यांनी सर्व तुरुंगांच्या अधीक्षकांना आयसीजेएस(ICJS) प्रणाली वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत, परंतु दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेले पाकिस्तान आणि बांगलादेशमधील कैदी या सुविधेचा वापर करू शकणार नाहीत.
आतापर्यंत राज्यातील ३,१४५ कैद्यांनी त्यांच्या नातेवाईकांशी ई- मीटिंगद्वारे संवाद साधला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या १ हजार ५८ कैद्यांनीही याचा लाभ घेतला आहे. शिक्षा झाल्यानंतर आरोपी वेगवेगळ्या कारागृहात असतात, यामुळे ते त्यांच्या कुटुंबीयांशी बराच वेळ बोलू शकत नाहीत. इतर जिल्ह्यातील, राज्यातील कैद्यांना भेटणे नातेवाईकांना शक्य होत नाही. त्यासाठी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) तयार करण्यात आले आहे, जेणेकरून कैदी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्कात राहतील. सर्व कारागृहात ई-मीटिंग रूम बनवण्यात आल्या आहेत. कारागृहात बंद कैद्यांना भेटण्यासाठी नातेवाईकांना बराच वेळ वाट पाहावी लागायची व नीट बोलणेेसुद्धा व्हायचे नाही.
आता प्रशासनाची वेळ घेऊन व्हिडिओ कॉलद्वारे कैद्यांशी, नातेवाईक संवाद करू शकतात. त्यांना ई-मीटिंग प्रणालीद्वारे फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. या प्रणालीचे कैदी आणि त्यांच्या नातेवाईकांनी स्वागत केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. सर्व कारागृह अधीक्षकांना सूचना फलक परिसरात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या कैद्यांनाच त्याचा लाभ मिळणार नाही. नायजेरिया, केनिया, कोलंबिया, इराण, इराक, थायलंड, ब्राझील, चीन आणि नेपाळ या देशांचे, तुरुंगांमध्ये ६३७ कैदी आहेत. या योजनेचा लाभ त्यांनाही मिळणार आहे. व्हिडीओ कॉलिंगद्वारे कैद्यांना परदेशात बसलेल्या नातेवाईकांशी बोलता येणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड