भूकंपामुळे चीन हादरला, ५.५ रिश्टर स्केलच्या तीव्रतेने १२६ इमारती जमीनदोस्त

बीजिंग, ६ ऑगस्ट २०२३ : चीनच्या शेडोंग प्रांतात भूकंपाचे जोरदार झटके जाणवले आहेत. या भूकंपामुळे शेडोंगमध्ये हाहा:कार उडाला आहे. हा भूकंपाचा धक्का इतका भयानक होता की त्यामुळे इमारती स्प्रिंगसारख्या हलू लागल्या. त्यामुळे लोक घाबरून इमारतीबाहेर पळाले. पळताना अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. अनेकांना पळतानाच पडल्याने मार लागला, तर अनेकजण जखमीही झाले. आज मध्यरात्री २ वाजून ३३ मिनिटांनी हा भूकंप झाला. देशभरातील लोक गाढ झोपेत असताना हा धक्का जाणवला. या भूकंपाने किती नुकसान झाले हे कळले नाही. पण सकाळ होताच धक्कादायक चित्र समोर आले. या भूकंपामुळे १२६ इमारती जमीनदोस्त झाल्या. अनेक घरे कोसळली. या भूकंपात आतापर्यंत २१ लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अजूनही समोर आलेला नाही. मात्र, भूकंपामुळे चीन संपूर्ण हादरून गेला आहे.

चीनमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५ एवढी नोंदवली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू देझोऊ येथे होता. जमिनीखाली केवळ १० किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याने एवढा मोठा हाहा:कार उडाला आहे. चीनची राजधानी बीजिंगपासून ३०० किलोमीटर अंतरावर हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता. चीनी भूकंप नेटवर्क केंद्राच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५ एवढी होती.

या भूकंपानंतर रात्रीच्या अंधारातील काही फोटो चीनी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत लोक पळताना दिसत आहेत. इमारत, संरक्षक भिंती आणि घरे कोसळल्याने मातीचा ढिगारा रस्त्यावर पडलेला दिसत आहे. लोक अंधारात जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहे. काही लोक एकमेकांना धडकल्याने जमीनवर कोसळले. काही पळताना पडले. त्यामुळे त्यांना मार लागला आहे. फायर फायटर्सना रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी तैनात करण्यात आले असून ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे.

भूकंपची तीव्रता पाहता ट्रेन रोखण्यात आल्या. रेल्वे ट्रॅकची तपासणी सुरू आहे. रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. भूकंपाचे केंद्र जमिनीखाली १० किलोमीटर आत असल्याने भूकंपामुळे मोठे नुकसान झाले असावे असे सांगितले जात आहे. काही ठिकाणी गॅस पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे गॅस पाईपलाईनचा पुरवठा रोखण्यात आला आहे. या पाईपलाईनच्या तपासणीसाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.

चीनप्रमाणे भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरपासून ते चंदीगड-पंजाबमधील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीतील भूकंपाची तीव्रता ५.८ एवढी नोंदवली गेली आहे. शनिवारी सकाळी जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.२ एवढी नोंदवली गेली होती. जूनपासून आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये छोटे मोठे १२ भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा