लडाख, १९ सप्टेंबर २०२२: लडाखमध्ये सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. लडाखच्या कारगिलमध्ये सकाळी ९.३० वाजता हे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १० किमी खाली होता.
यापूर्वी शनिवार-रविवारी तैवानमध्ये २४ तासांत तीन भयानक भूकंप झाले होते. या भूकंपांमध्ये खूप नुकसान झाले. तैवानमध्ये अनेक ठिकाणी रस्ते तुटले आहेत. पूल पडले आहेत. गाड्या रुळावरून घसरल्या होत्या. पुलाला तडे गेल्याने अनेक वाहने पुलाखाली पडली. भूकंपामुळे तैवानपासून जपानपर्यंत सुनामीचा इशारा देण्यात आला होता. या भूकंपांची तीव्रता ६.४ ते ७.२ इतकी होती.
१६ सप्टेंबरला झाला होता लडाखमध्ये भूकंप
यापूर्वी १६ सप्टेंबरलाही पहाटे ४.१९ वाजता लडाखमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.८ इतकी होती. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अल्ची (लेह) पासून १८९ किमी उत्तरेस होता आणि त्याची खोली जमिनीपासून १० किमी खाली होती.
ऑगस्टमध्ये १०७ वेळा भूकंप
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ऑगस्टमध्ये भारत आणि आसपासच्या देशांमध्ये १०७ भूकंपांची नोंद केली आहे. त्यापैकी ९९ भारतातील विविध राज्यांत आले. भारतातील भूकंपाची तीव्रता ३.०-३.९ आणि ४.०-४.९ दरम्यान मोजली गेली.
जम्मू-काश्मीरमध्ये १४ वेळा भूकंपाचे धक्के
ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये १४ भूकंप झाले. हे सर्व भूकंप २.६ ते ४.१ रिश्टर स्केलचे होते. १४ भूकंपांपैकी ९ वेळा डोडा येथे भूकंप झाले. उधमपूरमध्ये ३ वेळा, किश्तवाडमध्ये २ वेळा. २४ ऑगस्ट रोजी डोडा येथे सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप झाला. त्यावेळी भूकंपाची तीव्रता ४.१ इतकी होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे