बिपरजॉय चक्रीवादळाच्या सावटाखाली असणाऱ्या कच्छ मध्ये भूकंपाचे धक्के

कच्छ, गुजरात १५ जून २०२३ : अरबी समुद्रात सध्या बिपरजॉय चक्रीवादळ घोंघावत आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आणि गुजरात या राज्यांना बिपरजॉय चक्रीवादळाचा धोक्याचा इशारा देण्यात आलाय. हे चक्रीवादळ गुरुवारी कच्छच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली. आधीच येथील स्थानिक लोकांच्या मनात चक्रीवादळाची भीती कायम असतानाच येथे बुधवारी ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले.

गांधीनगर येथील भूकंपशास्त्र संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छ जिल्ह्यातील बछाऊपासून पश्चिम-नैऋत्य दिशेला पाच किलोमीटर अंतरावर आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के लोकांना जाणवले. आतापर्यंत नुकसान किंवा जीवितहानीबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील सौराष्ट्र, द्वारका आणि कच्छ किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी केल्यानुसार चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा