मुंबई, १८ ऑगस्ट २०२३ : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांचा जवळचा मित्र उद्योगपती सुजित पाटकर यांना अटक केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाटकर यांना लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसशी संबंधित एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पाटकर यांना याच प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. पाटकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मूळ तक्रार भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते किरीट सोमय्या यांनी कोविड केंद्र चालवण्याच्या कथित घोटाळ्याबद्दल दाखल केली होती.
आर्थिक गुन्हे शाखा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कोविड केअर केंद्रांच्या स्थापनेत आणि व्यवस्थापनातील कथित अनियमिततेची चौकशी करत आहे. पाटकर यांची अटक ही या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने केलेली चौथी अटक आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान असे आढळून आले की, कोविड केंद्रांच्या करारासाठी सादर केलेली कागदपत्रे बनावट होती.
सत्र न्यायालयाने गेल्या आठवड्यात या प्रकरणात पाटकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पाटकर यांना शनिवारी एजन्सीच्या कार्यालयात आणून चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली, असे या अधिकाऱ्याने सांगितले. त्यांला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड