४२५ कोटींच्या फसवणूक प्रकरणी ‘सेवा विकास’ बँकेच्या माजी अध्यक्षाला अटक, ईडी ची कारवाई

पुणे, ५ जुलै २०२३ : सक्तवसुली संचालनालयाने ४२५ कोटींच्या फसवणूक प्रकरणी, सेवा विकास सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अमर साधुराम मुलचंदानी यांना अटक केली आहे. न्यायालयाने मुलचंदानी यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. १२४ एनपीए कर्ज खात्यांमध्ये सेवा विकास सहकारी बँकेचे ४२५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

एनपीए कर्ज खात्यांमुळे बँक दिवाळखोरीत निघाली असून हजारो लहान ठेवीदारांचे नुकसान झाले आहे. ‘ईडी’ने मुलचंदानी आणि इतर संचालक, अधिकारी आणि कर्ज चुकविणाऱ्यांच्या विरुद्ध पुण्यात नोंदवलेल्या अनेक एफआयआर च्या आधारे तपास सुरू केला होता. मुलचंदानी कौटुंबिक मालकी प्रमाणे बँकेचे व्यवहार करत होते, असे ईडीच्या तपासात समोर आले आहे.

मुलचंदानीने बँकिंग नियमांचे उल्लंघन करून त्यांच्या पसंतीच्या कर्जदारांना बेकायदेशीरपणे कर्ज मंजूर केले. त्यांनी मंजूर कर्जाच्या रकमेच्या २० टक्के कमिशनच्या दराने लाच देखील घेतली, असे ईडीने स्पष्ट केले आहे. सेवा विकास सहकारी बँकेची ९२ टक्क्यांहून अधिक कर्ज खाती एनपीए झाल्याने शेवटी बॅक कोलमडली. या प्रकरणात मुलचंदानी यांच्या १२२.३५ कोटी रुपयांची मालमत्ता तसेच इतर विविध बेनामी मालमत्ता तात्पुरत्या जप्त करण्यात आलेल्या.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा