अबकारी घोटाळा प्रकरणात ईडीचे ३ राज्यांमध्ये ३५ ठिकाणी छापे

नवी दिल्ली, ७ ऑक्टोंबर २०२२ : दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याच्या संदर्भात, अबकारी मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED) ने ३ राज्यांमध्ये ३५ ठिकाणी छापे टाकले आहेत. या प्रकरणात पंजाब आणि आंध्र प्रदेशचे कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुरू झालेले छापे दिल्ली, पंजाब आणि आंध्र प्रदेशमध्ये सुरू आहेत. केंद्रीय एजन्सीच्या ताब्यात असलेल्या आरोपींपैकी समीर महेंद्रू या एका आरोपीची चौकशी केली असताना या प्रकरणात पंजाब आणि आंध्र प्रदेशचे कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. तर हैदराबाद मध्ये अधिक पथके घोटाळ्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या काही उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या परिसरात ही छापे टाकत आहेत.

तर या छापेमारीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले की मागच्या ३ महिन्यांपासून ५०० हून अधिक छापे तर ३०० हून अधिक CBI-ED अधिकारी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात पुरावे शोधण्यासाठी २४ तास काम करत आहेत. या तपासात काहीही सापडले नाही कारण काहीही झाले नव्हते. इतक्या अधिकाऱ्यांचा वेळ त्यांच्या गलिच्छ राजकारणासाठी वाया जात आहे. अशा देशाची प्रगती कशी होणार?” अशा शब्दांत केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

उत्पादन शुल्क धोरण (अबकारी) घोटाळ्याच्या संदर्भात केंद्रीय एजन्सी छापे टाकण्याची ही तिसरी वेळ आहे. आतापर्यंत सुमारे १०० ठिकाणी छापे टाकले आहेत. आता तपास यंत्रणा मनी लॉन्ड्रिंगमधील मनी ट्रेल साफ करण्यासाठी कागदोपत्री आणि डिजिटल पुरावे गोळा करत आहे. ईडी काळ्या पैशाचे पदर उलगडण्याचा प्रयत्न करत असताना हे प्रकरण गुंतागुंतीचे होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा