महाराष्ट्र आणि केरळमध्ये ईडीचे छापे, १२ कोटींच्या स्थावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त

मुंबई, ५ ऑगस्ट २०२३ : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी सांगितले की, कुवेत सरकारसाठी भारतीय परिचारिकांच्या भरतीत कथित फसवणूक झाल्याच्या प्रकरणात झालेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून त्यांनी महाराष्ट्र आणि केरळमध्ये छापे टाकले. ही छापेमारी गुरुवारी सुरू झाली. त्याअंतर्गत मुंबईतील मॅथ्यू इंटरनॅशनलचे मालक पुथेनवीतिल जोसेफ मॅथ्यू उर्फ पीजे मॅथ्यू यांच्या निवासस्थानावर तसेच दोन्ही राज्यांतील अनेक व्यावसायिक आणि निवासी जागेवर छापे टाकण्यात आले.

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) विविध कलमांतर्गत नोंदवण्यात आलेला हा खटला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) एफआयआरवर आधारित आहे. ज्यात गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होऊन परदेशी लोकांकडून कोट्यवधींची बेकायदेशीर ब्लॅक-मनी गोळा केल्याचा आरोप आहे. पीजे मॅथ्यू आणि त्यांचा मुलगा थॉमस मॅथ्यू यांनी, २०१५ मध्ये मोहम्मद नयना प्रभू यांच्यासोबत कुवैती मंत्रालयात परिचारिकांच्या भरतीसाठी फसव्या पद्धतीने परवान्याचा वापर करून गुन्हेगारी कट रचला. प्रभू यांच्या मालकीची मुंबईस्थित मुनावरा असोसिएट्स फर्म असून कंपनीने भारत सरकारकडून हा परवाना मिळवला आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सांगितले की, आरोपींनी कोचीमध्ये प्रत्येक अर्जदाराकडून भरीव सेवा शुल्क आकारून परिचारिकांची भरती केली. सेवा शुल्काची कमाल रक्कम २० लाख रुपयांपर्यंत आहे. ईडीने म्हटले आहे की पीजे मॅथ्यू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भरती झालेल्या परिचारिकांची फसवणूक करुन त्यांच्याकडून २०५.७१ कोटी रुपये कमावले. छापे टाकल्यानंतर झडती दरम्यान बँक खात्यांमध्ये पडलेली ७६ लाखांची रक्कम गोठवण्यात आली आणि सुमारे १२ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली. आता प्रकरण न्यायालयाच्या अधीन आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा