ईडीने कोव्हिड घोटाळा खणून काढण्याचा बांधला चंग, मुंबई महापालिकेच्या दोन बड्या अधिकाऱ्यांच्या घरावर छापा

28

मुंबई २२ जून २०२३: मुंबईतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी काल ईडीने १६ ठिकाणी छापेमारी केली. त्यात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह ठाकरे गटाशी संबंधितांचा समावेश होता. ईडीच्या छापेमारीमुळे एकच खळबळ उडाली आहे. ईडीने सुरू केलेल्या घोटाळ्याच्या चौकशीमुळे ठाकरे गट चांगलाच अडचणीत आला आहे. कालच्या छापेमारीनंतर ईडीची कारवाई थांबेल असे वाटत असतानाच, ईडीने आज सकाळीच मुंबई महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांच्या घरी छापेमारी केली. हे दोन्ही महत्त्वाचे अधिकारी असून त्यांचा थेट कोव्हिडच्या टेंडर प्रक्रियेशी संबंध असल्याचे बोलले जातय.

काल ईडीने पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी छापेमारी केली. त्यानंतर खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. ही छापेमारी सुरू असतानाच आदित्य ठाकरे यांचे जवळचे सहकारी सुरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानीही ईडीकडुन छापे मारण्यात आले. ईडीने या कोव्हिड घोटाळ्या प्रकरणी मुंबई, पुण्यातील एकूण १६ ठिकाणी छापेमारी केली.

काल सुरज चव्हाण यांच्या घरी सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दीड वाजेपर्यंत ईडीचे धाडसत्र सुरू होते. साडे सोळा तास ईडीने ही छापेमारी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ईडीने यावेळी सुरज चव्हाण यांची कसून चौकशी केल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, या छापेमारीत ईडीच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले की नाही याची माहिती मिळू शकली नाही. या छापेमारीवर ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करण्यात आलाय. सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर ईडीची कारवाई का होत नाही. असा प्रश्न ठाकरे गटाकडून केला जातोय.

ईडीने आज सकाळीच पालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड आणि तत्कालीन उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या निवासस्थानी धाड मारली. दोघांच्याही घरात कसून चौकशी केली जातेय. प्रत्येक कागदपत्रांची छाननी केली जात आहे. दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी केली जात आहे. तसेच या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही बाहेर जाऊ दिले जात नाही. तसेच कुणालाही आत सोडले जात नाही. हे दोन्ही अधिकारी या घोटाळ्यातील महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे.

सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन कंपनीला बेकायदेशीर कंत्राट देण्यात आले होते. टेंडर प्रक्रियेत पालिकेतील अधिकाऱ्याचा सहभाग होता का? याचा तपास सुरू करण्यात आलाय. तसेच या अधिकाऱ्यांकडून या घोटाळ्याशी संबंधित आणखी माहिती घेण्याचाही ईडीचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई महापालिकेतील अजून काही अधिकारी ईडीच्या निशाण्यावर असण्याची शक्यता वर्तवली जातेय.

न्यूज अन कट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा