मुंबई, २८ डिसेंबर २०२०: पीएमसी बँक घोटाळ्यातील तपास आता संजय राऊत यांच्या घरापर्यंत येऊन पोहोचला आहे. या प्रकरणात ईडीने संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वर्षा राऊत यांना यापूर्वी दोनदा समन्स बजावले होते, परंतु त्यांची तब्येत खराब असल्याचे त्या चौकशीसाठी येऊ शकल्या नव्हत्या. ईडीने मंगळवारी वर्षा राऊत यांना ईडीच्या अधिकार्यांकडे चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. यानुसार येत्या २९ डिसेंबरला ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
आरोपी सोबत वर्षा राऊत यांचा व्यवहार
ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार पीएमसी घोटाळ्यातील आरोपींसह वर्षा राऊत यांच्या व्यवहाराचे पुरावे सापडले आहेत. या घोटाळ्याचा आरोपी प्रवीण राऊत याच्या पत्नीबरोबर ५० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचा पुरावा प्राथमिक तपासात सापडला आहे. परंतु ही रक्कम त्याहूनही जास्त असू शकते. ते म्हणाले की पीएमसी बँक घोटाळ्याची रक्कम विविध कंपन्यांमध्ये अनेक स्तरांमध्ये विभागली गेली आहे. या कंपन्यांचे तसेच त्यांचे प्रवर्तक, संचालक आणि मूळ लाभार्थी यांचे सर्व व्यवहार शोधण्यात येत आहेत. या घोटाळ्याशी संबंधित सर्व व्यवहारांची चौकशी केली जात असून या संदर्भात वर्षा राऊत यांनाही समन्स बजावले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
“मला याची काहीही कल्पना नाही. माझ्यापर्यंत याबाबत काहीही माहिती नाही. जर घरी नोटीस आली असेल, तर मी स्वत: याबाबत पत्रकार परिषद घेईन आणि माहिती देईन, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे