गोल पोस्ट राजकारण सुरज चव्हाण यांना चौकशीसाठी ईडीचे समन्स, ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार?

सुरज चव्हाण यांना चौकशीसाठी ईडीचे समन्स, ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार?

मुंबई २३ जून २०२३: शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सुरज चव्हाण यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती समोर आलीय. कोरोना काळात सुरु करण्यात आलेले जम्बो कोविड सेंटर, तसेच मुंबई महापालिकेकडून काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याच आरोपांप्रकरणी सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने नुकताच सुरज चव्हाण यांच्या घरी छापा टाकला होता. या छापेमारीत ईडीच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे लागल्याची माहिती समोर आलीय, त्यानंतर आता चव्हाण यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले.

सुरज चव्हाण यांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ईडीने चव्हाण यांना सोमवारी २६ जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. या प्रकरणी ईडीने सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांनाही चौकशीचे समन्स बजावले होते, पण ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात आले नाहीत. त्यामुळे त्यांची चौकशी होऊ शकली नाहीत. संजीव जयस्वाल हे करोनो काळात मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त होते.

सुरज चव्हाण यांच्या घरावरील छाप्यामध्ये ईडी अधिकाऱ्यांना तब्बल दीडशे कोटीच्या संपत्तीचे कागदपत्रे मिळाली असुन यामध्ये ५० स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. तसेच ६८ लाख रुपयांच्या रोख रकमेसह अडीच कोटींचे दागिने अधिकाऱ्यांच्या हाती लागले. त्यामुळे हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला जातोय. ईडी अधिकाऱ्यांच्या हाती आता सुरज चव्हाण यांचे व्हाट्सअॅप चॅटही लागले आहेत. सुरज चव्हाण यांच्या सांगण्यावरुन सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट मिळाले, असा ईडीला संशय आहे. ईडी त्या दृष्टीकोनातून तपासही करत आहे.

एकीकडे ईडीकडून कारवाई सुरु आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून भाजप आणि शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. खासदार संजय राऊत यांनी तर थेट महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर आदित्य ठाकरे यांनी सुरज चव्हाण यांची भेट घेऊन शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version