खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली, २७ जुलै २०२३ : पावसाळी वातावरणात माणसाचा खवैय्येपणा अधिक जागृत होतो. आता भज्जी, समोसा, कचोरी असे पदार्थ घरबसल्या तळून खाता येईल, कारण खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या असुन त्या वर्षभराच्या निच्चांक किंमतीवर पोहचल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने संसदेत या बदलाची माहिती दिली.

रिफाईंड सनफ्लॉवर तेल, रिफाईंड सोयाबीन आणि रिफाईंड पाम तेलाच्या किंमतीत एका वर्षात मोठी घसरण झालीय. त्यामुळे शुद्ध सूर्यफुल तेलामध्ये २९%, शुद्ध सोयाबीन तेलाच्या किंमतीत १९% आणि पाम तेलाच्या भावात २५% ची घसरण झाली. खाद्यतेल स्वस्त झाल्याने या महागाईत जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे महिलांचे गृह खर्चाचे बजेट अधिक कोलमडले नाही. स्वस्त खाद्यतेलामुळे महागाईची आकडेवारी आटोक्यात आहे, असे संसदेत सांगण्यात आले.

केंद्र सरकारने लोकसभेत खाद्यतेलाच्या स्वस्ताई विषयी लेखी निवेदन दिले असुन केंद्र सरकारने तेलाचे भाव नियंत्रीत ठेवण्यासाठी पाऊले टाकल्याचे सांगण्यात आले. ग्राहक खात्याचे राज्यमंत्री निरंजन ज्योती यांनी निवेदन दिले. केंद्र सरकार गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत असल्याचा दावा करण्यात आला. जागतिक बाजारातही खाद्य तेलाच्या किंमती उतरणीला आहेत.

भारत रिफाईंड तेलाच्या ऐवजी कच्चे सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाची आयात करतो. तरीही केंद्र सरकारने रिफाईंड सोयाबीन आणि सूर्यफुल तेलावरील आयात शुल्कात कपात केली आहे. या कपातीमुळे रिफाईंड खाद्यतेलावरील शुल्क कमी होऊन १३.७% झाले आहे. यामध्ये सामाजिक कल्याण सेसचा सहभाग आहे. आता मुख्य खाद्यतेलावरील शुल्क ५.५% आहे. भारत खाद्यतेलाची मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून आहे. आयातीच्या माध्यमातून भारत ६०% मागणी पूर्ण करतो. देशात तेलबिया उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असले तरी त्यातून अद्याप काही साध्य झालेले नाही. काही वर्षात मात्र फरक दिसू शकतो.

पण त्यासोबतच मोहरीच्या आणि पामतेलातील भेसळीच्या बातम्यांनी चिंताही वाढवली आहे. काही प्रमुख खाद्यतेलांमध्ये भेसळ होत असल्याच्या बातम्यांनी गेल्या आठवड्याभरात सर्वांचीच चिंता वाढवली आहे. त्यामुळे खाद्यतेल खरेदी करताना त्याची खात्री करुन घ्या. तेलाच्या किंमती स्वस्त होत असताना काही व्यापारी भेसळ करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी भेसळयुक्त खाद्यतेलाची तक्रार करणे गरजेचे आहे. असे आवाहन या वेळी करण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा