मुंबई, ३० ऑगस्ट २०२१: केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्या संघर्षात चर्चेत आलेले मंत्री अनिल परब चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यातील भाजपानं अनिल परब यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ईडीनं मंत्री अनिल परब यांना नोटीस पाठवली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे. येत्या मंगळवारी परब यांनी ईडी कार्यालयात हजर रहावे असे समन्स बजावण्यात आले आहे.
ईडीची नोटीस नेमकी कशासाठी ?
नारायण राणे यांच्या अटकेसाठी अनिल परब यांनी दबाव टाकल्याचा आरोप भाजपाने केला होता. त्यानंतर ईडीनं पाठवलेल्या नोटिशीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मात्र माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.
संजय राऊत ट्विटमध्ये काय म्हणाले ?
” शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू..जय महाराष्ट्र,” असं संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.
नोटिशीनंतर काय म्हणाले अनिल परभ
या नोटिशीनंतर मंत्री अनिल परब म्हणाले की, आज संध्याकाळी ईडीची नोटीस मिळाली. त्यात कुठल्याही प्रकरणाचा उल्लेख नाही. केवळ ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता आमच्या कार्यालयात हजर व्हावं असं त्यात म्हटलं आहे. त्याव्यतिरिक्त नोटिशीत कुठलाही विशेष उल्लेख नाही. त्यामुळे नेमकी नोटीस कशाबाबत आहे हे सांगणं कठीण आहे. जोपर्यंत ती नोटीस कशाबद्दल आहे हे समजत नाही तोपर्यंत उत्तर देता येत नाही. नोटिशीत सविस्तर काय दिलं नाही. त्यात चौकशीचा भाग म्हणून उल्लेख आहे असं त्यांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे