महागाईचा परिणाम: तुमच्या पैशाचे मूल्य २० वर्षात घसरले इतके, कमी झाली क्रयशक्ती

पुणे, २४ सप्टेंबर २०२२: महागाईला अर्थशास्त्रात असा कर म्हणतात, जो दिसत नाही, पण त्याच्या प्रभावापासून कोणीही सुटू शकत नाही. हा एक कर आहे जो प्रत्येकजण भरतो. सध्या भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर ७ टक्के आहे आणि तो सलग आठ महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेच्या ६ टक्क्यांच्या वरच्या मर्यादेच्या वर आहे. महागाईचा सर्वात वाईट परिणाम असा होतो की त्यामुळे पैशाचे मूल्य कमी होते, म्हणजेच क्रयशक्ती कमी होते. २० वर्षांपूर्वी १००० रुपयांनी काय खरेदी करणे शक्य होते आणि आज इतक्या रुपयांत काय खरेदी करता येईल हे जाणून घेऊया…

बिझनेस टुडेने या तुलनेसाठी CMIE कडील ऐतिहासिक डेटाची मदत घेतली आहे. यावरून असे दिसून येते की, गेल्या २० वर्षांत काही वस्तूंच्या किमती ४०० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. बिझनेस टुडेने तृणधान्ये, कडधान्ये, पेट्रोल आणि पेट्रोलियम उत्पादने आणि इतर मौल्यवान धातू यासारख्या वस्तूंच्या किमती तुलना करण्यासाठी वापरल्या. हे पाहिल्यावर गेल्या २० वर्षांत भारतीयांच्या क्रयशक्तीवर कसा परिणाम झाला हे स्पष्टपणे दिसून येते.

तृणधान्ये :

गेल्या २१ वर्षांत बिगर बासमती तांदळाच्या किमतीत ४२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०००-०१ मध्ये त्याची घाऊक किंमत ५.२७ रुपये होती, ती आता २७.५५ रुपये झाली आहे. अशाप्रकारे २००१ मध्ये १९० किलो बिगर बासमती तांदूळ १००० रुपयांना खरेदी करणे शक्य होते, परंतु आता केवळ ३६ किलो खरेदी करणे शक्य आहे. तसेच बासमती तांदळाचा भाव ६२९ रुपये प्रतिक्विंटलवरून ६१०७ रुपये झाला आहे. ही ८७० टक्क्यांची मोठी झेप आहे. या २१ वर्षात गव्हाचे भाव १६६ टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचप्रमाणे या कालावधीत ज्वारी आणि बाजरीच्या दरात अनुक्रमे ४२० आणि २४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पेट्रोलियम उत्पादने:

२००२-०३ मध्ये दिल्लीत पेट्रोलची किंमत २९.५ रुपये प्रति लिटर होती, जी आता २३३ टक्क्यांनी वाढून ९८ रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे डिझेलचा दर ३६० टक्क्यांनी वाढून १९ रुपयांवरून ८७.५ रुपये प्रति लिटर झाला आहे. म्हणजे २००३ मध्ये ५२ लिटर डिझेल १००० रुपयांना मिळत असत, पण आता फक्त ११ लिटरच मिळणार आहे.

सोने आणि चांदी :

२००४-०५ मध्ये मुंबईच्या बाजारात १० ग्रॅम सोने ६००० रुपयांना उपलब्ध होते. आता त्याची किंमत ७०० टक्क्यांनी वाढून 48 हजार रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. तसेच चांदीची किंमत २००४-०५ मध्ये १०,३५० रुपये प्रति किलोवरून ५२७ टक्क्यांनी वाढून ६४,९०० रुपये प्रति किलो झाली आहे.

दरडोई उत्पन्न:

या काळात केवळ वाईटच वाईट झाले असे नाही. महागाईमुळे क्रयशक्ती कमी झाली आहे, पण त्यासोबतच लोकांचे उत्पन्नही वाढले आहे, यात शंका नाही. २०००-०१ मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न फक्त १८,६६७ रुपये होते. आता ती वाढून १.५० लाख झाली आहे. याचा अर्थ गेल्या २१ वर्षात भारतातील लोकांचे सरासरी उत्पन्न ७०० टक्क्यांनी वाढले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा