पुणे, दि. ५ जुलै २०२०: काल पुण्याच्या महापौरांनी आपल्याला कोविड -१९ ची लागण झाल्याचे आपल्या ट्विटर अकाऊंटवरून घोषित केले होते. काही दिवसांपासून त्यांना सौम्य ताप होता. त्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र आता यानंतर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील व्यक्तींना देखील आता कोविड -१९ ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु यामध्ये धक्कादायक बाब अशी आहे की एक किंवा दोन व्यक्तींना विषाणूची लागण झालेली नसून तब्बल आठ लोकांना कोविड -१९ ची लागण झाल्याचे समोर आले आहे.
काल मोहोळ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, “थोडासा ताप आल्याने मी कोरोनाची चाचणी करुन घेतली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.”
दरम्यान, पुण्यातील भाजपाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे रविवारी सकाळी स्पष्ट झाले. त्यांनीही ट्विटद्वारे आपला चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केले. “दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची कोरोनाची तपासणी करून घेतली असताना हा अहवाल पॉझिटिव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे,” असे ट्विट त्यांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी