एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आक्रमक

मुंबई ११ मे २०२३ : मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय कदाचित चुकला असेल, कायदेशीरदृष्ट्या तो निर्णय योग्यही नसेल. परंतु त्यावेळी मी नैतिकदृष्ट्या घेतलेला निर्णय योग्यच आहे ज्यांनी माझ्याशी गद्दारी केली. विश्वासघात केला त्यांच्यासाठी मी विश्वास दाखवणे शक्यच नव्हते त्यामुळे मी राजीनामा दिला. माझ्या मध्ये नैतिकता शिल्लक होती म्हणून मी राजीनामा दिला. पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जराही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पत्रकार परिषदेत केला.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर उद्धव ठाकरे अधिकच आक्रमक झाले असून पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.ज्या लोकांना माझ्या वडिलांनी सर्व काही दिले. त्याच लोकांनी माझ्यावर बोटे दाखवली, त्यांच्यासाठी मी विश्वास किंवा अविश्वास दाखवणे शक्य नव्हते त्यांनी मला प्रश्न विचारायचा अधिकारच नव्हता.

गद्दारांनी माझ्यावर अविश्वास आणावा आणि मी त्याचा सामना करावा हे कसे शक्य आहे? असं सांगतानाच राज्यात सरकारच नाही. या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये नैतिकता असेल तर त्यांनी जसा मी राजीनामा दिला तसा आपल्या पदांचा राजीनामा द्यावा. अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

भावनिकता हा माझ्या घराण्याचा गुण किंवा दोष असेल,परंतु ज्या घराने तुम्हाला सर्व काही दिले आणि सर्व काही देऊनही त्यांनी माझ्या पाठीत वार करावा, माझ्यावर अविश्वास आणावा हे मला पटले नाही. आधीच ते गद्दार, त्यांनी विश्वासघात केला. विश्वासघात करणाऱ्यांकडून जर मला विश्वासदर्शक, अविश्वासदर्शक ठरावाबाबत विचारले जात असेल तर ते चुकीचे असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा