चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देणार – एकनाथ शिंदे

सिंधुदुर्ग, ६ जून २०२३: सिंधुदुर्ग जिल्हा निसर्ग संपन्नतेने नटलेल्या जिल्हा आहे. येथील पर्यटन वाढीसाठी सर्वकाही करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी आंबोलीत नवीन हिल स्टेशन उभारण्यात येईल, मुंबई-गोवा महामार्गाला चालना देण्यात येईल. तसेच चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सावंतवाडी येथे केली. यावेळी विविध विकासकामांचे भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील सरकारच्या काळात अनेक प्रकल्प थांबविण्यात आले होते, पण आम्ही सत्तेवर आल्यानंतर सर्व प्रकल्पांना गती दिली आहे. यापूर्वी कोणत्याही सरकारने दिला नसेल, इतका निधी सिंधुदुर्गाला दिला आहे. कोकणात पर्यटन वाढीसाठी सर्वकाही करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

येथील विकासकामांना गती देण्यासाठी ११० कोटींचा भरघोस निधी देण्यात आला आहे. आणखी निधी देण्यास सरकार कमी पडणार नाही. महिला गटांना सक्षम करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. खेळाडूंना वाव देण्यासाठी कोकणात तीन क्रिडा संकुल बांधण्यात येतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. राज्यातील आपलं सरकार लोकांना न्याय देणारे आहे, असंही ते म्हणाले.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा