एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती विषयक चुकीची माहिती, पुणे न्यायालयाकडून चौकशीचे आदेश

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपशी हात मिळवणी करून नवीन सरकार स्थापन केलं. सरकार तर स्थापन केलंय परंतु हे सरकार चालवताना त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अशातच त्यांच्या अडचणीत आणखीन एक भर पडलीय. कारण एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आलाय. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरदास यांनी कोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेची पुणे न्यायालयाने दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

अभिषेक हरदास यांच्या म्हणण्यानुसार विधानसभा निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीमध्ये तफावत होती. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या 2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत शेतकी जमीन आणि बिगर शेतकी जमीन, निवासी इमारती, स्थावर आणि जंगम मालमत्ता, तसंच त्यांची शैक्षणिक अहर्ता यात मोठी तफावत होती. ही बाब आम्ही अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर ही बाब आणून दिली आणि आज न्यायालयाने सीआरपीसी 200 चे आदेश दिले असल्याची माहिती अभिषेक हरदास यांनी दिलीय.

एकनाथ शिंदे यांच्याकडे किती संपत्ती

एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकारणातील सुरुवात रिक्षाचालकापासून केली. मात्र आता हा प्रवास मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला आहे. या सर्व कालावधीत त्यांच्या संपत्तीत वाढ होत गेली. 2019 च्या विधानसभा निवढणुकीत त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 11 कोटी 56 लाखापेक्षा अधिकची संपत्ती आहे. त्यातील 9.45 कोटी स्थावर तर 2.10 कोटीची जंगम मालमत्ता आहे. एकनाथ शिंदे यांनी आपला व्यवसाय हा बांधकामाचा असल्याचं म्हटलंय. त्यांच्याकडे एकूण 7 गाड्या आहेत आणि त्याची किंमत 46 लाख रुपये आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा