कमलनाथ यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, स्टार प्रचारक यादीतून वगळलं नाव

मध्य प्रदेश, ३१ ऑक्टोबर २०२०: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई केली आहे. कमलनाथ यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून आयोगानं हटवलं आहे. आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगानं कारवाई केली. तथापि, कमलनाथ मध्य प्रदेश पोटनिवडणुकीत प्रचार करू शकतील, परंतु पक्ष खर्च देणार नाही तर उमेदवाराला प्रचारासाठीचे पैसे द्यावे लागतील.

कमलनाथ यांच्याविरोधात आचारसंहितेचं उल्लंघन केल्याच्या तक्रारी सातत्याने येत असल्याचं निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. भाजपा नेत्या इम्रती देवी यांना आयटम बोलल्यानंतर कमलनाथ यांनी शिवराज सिंग यांना दुसर्‍या एका रॅलीत नौटंकी कलाकार म्हणून संबोधलं.

मध्य प्रदेश आयोगाच्या सीईओच्या अहवालाच्या आधारे कमलनाथ यांना आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल दोषी मानलं. निवडणूक आयोगानं वारंवार इशारा देऊनही कमलनाथ यांनी आपल्या आचरणात सुधार न आणल्यामुळौ कठोर कारवाई करत आदर्श आचारसंहितेच्या कलम एक आणि दोन अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगानं यापूर्वी कमलनाथ यांच्याकडं आयटम स्टेटमेंटवर उत्तर मागितलं होतं. त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावल्याचं कमलनाथ म्हणाले. कमलनाथ यांना निवडणूक आयोगाने सल्ला देखील दिला होता.

कमलनाथ यांना सल्ला देताना निवडणूक आयोगाने सांगितलं की, निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना अशा शब्दांचा वापर सार्वजनिकपणे करता कामा नये.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा