निवडणूक आयोगाकडून राज्यात सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये निवडणुका घेण्याचे संकेत

8

पुणे, ७ जुलै २०२३ : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. एक वर्षा पूर्वी शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट वेगळा झाला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा गट वेगळा झाला. आता सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीसोबत राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत आला. यामुळे सत्ताधारी पक्ष राज्यात अधिक मजबूत झाला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहे.

महाराष्ट्रात २३ महानगरपालिकांची मुदत संपली आहे. त्यांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. तसेच २५ जिल्हा परिषदा आणि २०७ नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदांच्या निवडणुका महत्वाच्या असतात. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांच्या निवडणुका होतात. तसेच राज्यातील ९२ नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. या सर्व निवडणुकांची इच्छुकांकडून स्थानिक पातळीवर वाट पाहिली जात होती. आता निवडणूक आयोगाने राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असल्यामुळे इच्छुकांनी तयारीला लागायला हरकत नाही.

राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आयोगाच्या राजपत्रात उल्लेख आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित करण्यात येत असल्याचा देखील पत्रात उल्लेख केला आहे. हे परिपत्रक सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाले आहे. ५ जुलै २०२३ रोजी काढलेले हे परिपत्रक आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे म्हटले होते.

मुंबई, पुण्यासह राज्यातील महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुका आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमच असणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा