लोकशाहीच्या बळकटीसाठी निवडणूक साक्षरता आवश्यक

बारामती : देशात दहावा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जात आहे. लोकशाही ही मतदान प्रक्रियेशिवाय पार पडू शकत नाही. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदारांमध्ये निवडणूक साक्षरता होणे आवश्यक आहे, असे मत उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी व्यक्त केले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दहाव्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन टी.सी.कॉलेज येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उप विभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, तहसीलदार विजय पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर, वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख डॉ. महेंद्र साळवे, राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.हनुमंत फाटक, प्रा. अविनाश सावळकर आदी उपस्थित होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे म्हणाले मतदान प्रक्रिया ही प्रशासन, राजकीय पक्ष आणि मतदार हे आहेत. ग्रामीण भागातील मतदारांना मतदानाचा अनुभव हा येत असतो. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रगल्भ मतदार हा आपण निर्माण केला पाहिजे. पूर्वीपेक्षा मतदान पध्दतीत तांत्रिक बदल हा होत आहे. नवमतदार आणि भविष्यकाळातील मतदार होणाऱ्यांनी मतदानाची प्रक्रिया समजून घेतली पाहीजे. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा हा भारत निवडणूक आयोगाचा संकल्प आहे. नव मतदारांनी मतदार नोंदणी करुन लोकशाही बळकटीकरणासाठी आपला सहभाग नोंदवावा असे ते आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी तहसीलदार विजय पाटील म्हणाले वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीमध्ये नांव नोंदविल्यानंतर आपण मतदान करु शकतो. प्रत्येक मतदाराला मतदान कार्ड दिले जाते.भारत देशाचे भवितव्य युवक -युवतींच्या हातात आहे. प्रत्येकाला मतदानाचा समान हक्क आहे. नेहमी शांततेत मतदान पार पाडले पाहिजे. प्रत्येकाने मतदान यादीमध्ये नाव नोंदवावे आणि भारतीय लोकशाही बळकट करावी.

टी.सी.महाविद्यायलयाचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरुमकर म्हणाले, शिक्षण घेत असतांना आपण विद्यार्थी असतो. परंतु शिक्षण संपल्यानंतर आपण जबाबदार नागरिक होतो. भारतीय लोकशाही ही जगातील मोठी लोकशाही आहे. भारतीय लोकशाही ही निकोप, सुदृढ आहे जे आपण भारतीय लोकशाहीचे घटक होण्यासाठी मतदार यादीत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. आपण मतदार तर आहोतच पण आपण जबाबदार मतदार असले पाहीजे. लोकशाही बळकट करण्यासाठी आपण मतदान केले पाहिजे. लोकशाहीमध्ये मतदानाबरोबर मतदाराला महत्त्व आहे. शिक्षण घेतलेल्यांनी लोकशाहीचे राजदूत म्हणून पुढे यावे, असेही ते शेवटी म्हणाले.

राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या निबंध, बुध्दीबळ, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांचे आभार प्रा.राजू पांडे यांनी मानले. यावेळी‍ टी.सी. महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा