कल्याण-डोंबिवली, दि. २५ जुलै २०२०: कोरोनामुळे केडीएमसीच्या परिवहन समिती सभापतीपदाची निवडणूक रखडली होती. मात्र त्यानंतर ही निवडणूक ऑनलाइन प्रक्रियेद्वारे होणार होती. यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु कोकण विभागीय आयुक्त लौकेश चंद्र यांनी सभापतीपदाची निवडणूक रद्द करण्याबाबत नवे आदेश महापालिकेला दिले. नव्या सभापतींची निवड जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत विद्यमान सभापती मनोज चौधरी कायम राहतील असे या आदेशात नमूद केले आहे.
रिवहन समिती सभापतीपदाची निवडणूक ही ऑनलाइन पद्धतीने होणारी राज्यातील पहिलीच निवडणूक ठरणार होती. महापालिका सचिव संजय जाधव यांनी ऑनलाइन निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. या ऑनलाइन प्रक्रियेला सभापती मनोज चौधरी यांनी हरकत घेतली होती. ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीप्रमाणेच लोकशाही पद्धतीने निवडणूक घ्या, असे पत्र त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांना पाठवले होते. मात्र निवडणूकांपेक्षा सध्याची कोरोना परिस्थिती बिकट असल्याने आयुक्तानी निवडणूका रद्द केल्या अस म्हंटल जात आहे.
कोकण विभागीय आयुक्त लौकेश चंद्र यांच्या आदेशानूसार महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या स्थायी समिती, विषय समिती तसेच सदस्य निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याबाबत निर्देश आहेत. त्याप्रमाणे पुढील आदेशापर्यंत परिवहन समिती सभापती निवडणूक रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक रद्द झाल्याने इच्छुकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे