मुजफ्फराबाद, १५ नोव्हेंबर २०२०: पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये आज पाकिस्तान निवडणुका घेत आहे. मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपाखाली एकूण २३ मतदारसंघांमधील ११६० मतदान केंद्रांवर एकूण ७,४५,३६१ मतदार मतदान करतील. निवडणुकीच्या विरोधाच्या भीतीनं पाकिस्ताननं सुमारे १६,००० सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, गिलगिट-बाल्टिस्तानची ही निवडणूक आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये सर्वात आव्हानात्मक असणार आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये इम्रान खान यांचा पक्ष पीटीआय आणि विरोधी पक्ष बिलावल भुट्टो यांचा पक्ष पीपीपी आणि नवाज शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एन यांच्यात मोठी स्पर्धा सुरू आहे. एकूण ३३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
इम्रानची पीटीआय आणि पीपीपी यांच्यात मुख्य स्पर्धा
गिलगिट-बाल्टिस्तान निवडणुका जिंकणे हा पंतप्रधान इम्रान खान आणि विरोधी पक्षांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. हेच कारण आहे ज्यामुळं या तिन्ही पक्षांनी निवडणूक जिंकण्याच्या अपेक्षेनं जोरदार प्रचार करत आचारसंहितेचं तीव्र उल्लंघन केलं आहे. एवढेच नव्हे तर निवडणूक आयोगाला १०० नोटीसा बजावाव्या लागल्या. राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार पीटीआय आणि पीपीपी यांच्यात मुख्य स्पर्धा गिलगिटमध्ये अपेक्षित आहे. पीपीपी’नं सर्व २३ जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत तर पीएमएल-एन’नं २१ जागांवर उमेदवारांना तिकिट दिलं आहे.
गिलगिटमध्ये निवडणुका घेण्यास भारताचा तीव्र विरोध
गिलगिट-बाल्टिस्तानमधील निवडणुकांना भारतानं तीव्र विरोध दर्शविला आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या घोषणेवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी अलीकडंच म्हटलं होतं की सैन्याच्या जोरावर व्यापलेल्या या प्रदेशाची परिस्थिती बदलण्याच्या कोणत्याही हालचालीला कोणताही वैध आधार नाही. तसंच सुरुवातीपासूनच ते बेकायदेशीर आहे.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे