महाराष्ट्रात वीज दर महागणार; ३७ टक्के दरवाढीचा प्रस्ताव पाठविला ‘एमईआरसी’कडे

पुणे, २९ जानेवारी २०२३ : महाराष्ट्रातील सामान्य माणसाला मोठा धक्का बसणार आहे. आता वीज महाग होणार आहे. नव्या वर्षात आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी महावितरण अन्य कोणत्याही मार्गाचा विचार करीत नाही. महावितरणने आता तोट्याचा संपूर्ण बोजा ग्राहकांच्या माथी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात वीजबिलात ३७ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महावितरणने हा प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) दिला आहे. पुढील दोन वर्षांसाठी विजेच्या दरात ३७ टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार घरगुती, व्यावसायिक, ग्रामीण अशा सर्वच क्षेत्रांत विजेच्या दरात वाढ जवळपास निश्चित झाली आहे.

महावितरण कंपनीच्या ग्राहकांचे विजेचे दर पाच वर्षांसाठी ठरलेले आहेत; पण दरम्यानच्या काळात या दरांचे मध्यावधी विश्लेषण केले जाते. सध्या लागू असलेला दर एप्रिल २०२० पासून लागू करण्यात आला. आता आढावा घेतल्यानंतर महावितरणने प्रस्ताव दिला असून, ‘एमईआरसी’ची मान्यता मिळाल्यानंतर एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सध्या घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांना किमान ३.३६ पैसे प्रति युनिट वीज मिळते. १ एप्रिल २०२३-२४ पासून हा दर ४.५० रुपये प्रति युनिटपर्यंत वाढू शकतो. प्रतियुनिट कमाल दराबाबत बोलायचे झाल्यास, तो रु. ११.८६ पैशांवरून रु. १६.६० पैसे प्रतियुनिटपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. २०२४-२५ मध्ये हाच दर आणखी वाढवून ५.५० पैसे आणि रुपये १८.७० पैसे प्रतियुनिट करण्याचा प्रस्ताव आहे.

तसेच शेतकऱ्यांचे वीजबिल १.९५ पैसे प्रतियुनिटवरून २.७० पैसे आणि ३.२९ रुपये प्रतियुनिटवरून ४.५० पैसे वाढण्याची शक्यता आहे. महावितरणने नुकतेच विजेचे दर वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या राज्य सरकारला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. सध्या हा प्रस्ताव ‘एमईआरसी’कडे पाठविण्यात आला आहे. म्हणजेच हा निर्णय या नियामक संस्थेलाच घ्यायचा आहे. आता चेंडू ‘एमईआरसी’च्या कोर्टात आहे की ते वीजदरात प्रस्तावित वाढ मंजूर करणार की त्यात काही सुधारणा करणार.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा