नाशिक, ३० जून २०२३: आदिवासी बांधवांच्या हक्काच्या आरक्षणावर गदा आणण्याचा प्रयत्न सध्याचे सरकार करीत आहे, आदिवासी बांधवांच्या आरक्षणाचे तुकडे पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्याला विरोधासाठी १५ जुलै रोजी नाशिक येथे राज्यस्तरीय मोर्चाचे आयोजन केले आहे. या एल्गार मोर्चाचे नेतृत्व विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ करणार असल्याचे बैठकीत ठरले.
आदिवासींमध्ये इतर जमातींना आरक्षण दिले जाऊ नये अशी भूमिका आदिवासींनी घेतलीय. दिंडोरी रोडवरील नाथकृपा लॉन्स येथे सर्व आदिवासी प्रतिनिधी, आदिवासी बांधव व विविध संघटना यांची बैठक झाली. यावेळी आमदार मंजुळा गावीत, राजेश पाडवी, हिरामण खोसकर, सुनील भुसारा, दिलीप बोरसे, नितीन पवार, राजेश पाटील आजी माजी पदाधिकारी यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
धनगर आरक्षण संबधी हायकोर्टात १३ ते १४ तारखेला सुनावणी होणार असून त्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही समाजांना आपली भूमिका कोर्टात मांडावी लागणार आहे. धनगरांना आदिवासींचे आरक्षण सोडून कुठेही आरक्षण दया, अशी भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली आहे. त्यासाठी १५ जुलै ला आदिवासींनी एल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर