न्यूयॉर्क, २८ ऑक्टोबर २०२२ : जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांपैकी एक असलेल्या ट्विटरची आता विक्री झाली आहे. आपण विकत घेत असलेल्या कंपनीलाच ट्रोल करत एलोन मस्क यांनी ट्विटर विकत न घेताच निघून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेवटी ट्विटर आणि मस्क यांचे लागेबंध व्हायचेच होते. पण हे असतांना एकंदरीत ट्रोलिंगमुळे योग्यतेपेक्षा अधिक किंमत त्यांना मोजावी लागली आहे. $ ४४ अब्जचं हे अधिग्रहण मस्क यांनी स्वीकारलं आहे.
कंपनीचे नवीन मालक एलॉन मस्क म्हणाले, ‘भाषण स्वातंत्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे. ट्विटर हे असंच एक डिजिटल टाउन आहे, जिथे मानवतेच्या भविष्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाते. ट्विटरमध्ये प्रचंड क्षमता आहे. मला त्यात नवीन वैशिष्ट्ये जोडून ते पूर्वीपेक्षा चांगलं बनवायचं आहे. मी कंपनीसोबत काम करण्यास उत्सुक आहे. ते अनलॉक केल्याबद्दल मी वापरकर्त्यांचे आभार मानतो.’
सीईओ पराग अग्रवाल यांना हटवण्यात आले
ट्विटरवरून पायउतार झालेले भारतीय वंशाचे पराग अग्रवाल सुरुवातीपासूनच मस्क यांच्या विरोधात जोरदार आवाज उठवत आहे. मस्क यांनी ट्विटरसाठी बोली लावल्यापासून कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्याशी वाद झाला होता. पराग अग्रवाल यांनी कराराची घोषणा होताच टाऊन हॉलमध्ये कर्मचाऱ्यांना सांगितले की, ‘कंपनीचे भविष्य आता अंधारात आहे, मला माहित नाही की ते कोणत्या दिशेने जाईल.’
पराग अग्रवाल यांच्या या वक्तव्यानंतर आधीच अंदाज बांधले जात होते, की त्यांना ट्विटर सीईओ पदावरून हटवलं जणार. शुक्रवार २८ ऑक्टोबर २०२२ रोजी असेच काहीसे घडले. इलॉन मस्क यांनी ट्विटर डील पूर्ण केली आणि ते अॅक्शन मोडमध्ये येताच, पराग अग्रवाल यांना प्रथम बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांच्यासोबत कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे. याशिवाय लीगल पॉलिसी, ट्रस्ट आणि सेफ्टी विभागाचे हेड विजय गडदे यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
१४ एप्रिल रोजी मस्क यांनी ४३ अब्ज डॉलर मध्ये ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली. मस्क यांनी सांगितले होते , ” मी ट्विटरमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करण्याच्या आदल्या दिवसापासून १०० % भाग भांडवल प्रति शेअर ५४. २० डॉलरने म्हणजे प्रति शेअर ५४ % प्रीमियमने खरेदी करण्याची ऑफर देत आहे. ही माझी सर्वोत्कृष्ट आणि अंतिम ऑफर आहे. ती स्वीकारली गेली नाही तर, मला भागधारक म्हणून माझ्या स्थितीचा पुनर्विचार करावा लागेल”.
ट्विटरमध्ये मस्क यांची ९.२ % हिस्सेदारी आहे. ही माहिती ४ एप्रिल रोजी उघड झाली. मस्क यांनी सुरुवातीच्या फायलींगमध्ये ४३ अब्ज डॉलरची ऑफर दिली होती परंतु ट्विटरने कराराला मंजुरी दिल्यानंतर, हा आकडा ४४ अब्ज डॉलर पर्यंत पोहोचला. तथापि ट्विटर मधील बनावट खात्यांबद्दल ( स्पॅम अकाउंट्स ) अचूक माहिती नसल्यामुळे हा करार रद्द करत आहे, असे मस्क यांनी सांगितले. करार रद्द झाल्यानंतर ट्विटरने न्यायालयात धाव घेतली. परंतु, १३ सप्टेंबर रोजी ट्विटरच्या भागधारकांनी ४४ अब्ज डॉलरच्या कराराला मंजुरी दिली. ट्विटरच्या बहुसंख्य भागधारकांनी प्रति शेअर ५४.२० डॉलर च्या खरेदी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. कंपनीच्या सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयात गुंतवणूकदारांसोबत एका छोट्या कॉन्फरन्स कॉलमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
ट्विटर विकत घेतल्यानंतर पहिलं ट्विट..
इलॉन मस्क यांनी म्हटलं होतं की, “लोकशाहीसाठी फ्रीडम ऑफ स्पीच अतिशय महत्वाचं आहे. पण ट्विटर या तत्त्वाचं काटेकोरपणे पालन करतं का?”, असा प्रश्न युझर्सना विचारला होता. मस्क यांनी एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा विचार केला होता. जिथं यूझर्स त्यांना हवं ते लिहू शकतात. म्हणजे ट्विटरचे मालक झाल्यानंतर मस्क यांनी पहिलं ट्विट केले त्यात त्यांच्या विधानाचं स्क्रिन शॉट शेअर केले आहे. ज्यात मस्क यांनी ट्विटरवर फ्री स्पीच होण्याची मागणी केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड