इलॉन मस्क यांनी सोडले ट्विटरचे सीईओ पद, पुढील सीईओ असणार एक महिला

पुणे, १२ मे २०२३: ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क यांनी पद सोडण्याची घोषणा केली आहे. ट्विटरसाठी नवीन सीईओची निवड करण्यात आली आहे जो लवकरच या पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मस्क यांनी अद्याप नवीन सीईओच्या नावाची घोषणा केलेली नाही, मात्र ती महिला असल्याचे त्यांनी सूचित केले.

इलॉन मस्क यांनी ट्विट करून माहिती दिली की एक महिला सीईओ सहा आठवड्यांच्या आत या पदाचा कार्यभार स्वीकारू शकते. मस्क यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ४४$ अब्जांना ट्विटर विकत घेतले होते. कंपनीचे सीईओ पराग अगरवाल यांना पदावरून हटवल्यानंतर त्यांनी नवीन सीईओचा शोध सुरू केला.

मस्क यांनी नवीन सीईओचे नाव उघड केले नसले तरी वॉल स्ट्रीट जर्नलने त्यांच्या अहवालात दावा केला आहे की एलोन मस्क यांनी या कामासाठी कॉमकास्ट एनबीसी युनिव्हर्सलच्या जाहिरात प्रमुख लिंडा याकारिनो यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, यावर लिंडाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. नुकतेच मस्कने एका मुलाखतीत सांगितले की ट्विटर चालवणे ‘खूप वेदनादायी’ होते.

इलॉन मस्क यांनी ट्विट केले- मी ट्विटरसाठी नवीन सीईओची निवड केली आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. येत्या सहा आठवड्यांत त्या पदभार स्वीकारतील. राजीनामा दिल्यानंतर माझी भूमिका कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अशी असेल.

न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा