शेतक-यांना व पुरग्रस्तांना तातडीची रू. 25 हजाराची मदत द्यावी – हर्षवर्धन पाटील

इंदापूर, २१ ऑक्टोबर २०२०: इंदापूर तालुक्यात व जिल्ह्यामध्ये दि. 14 व 15 ऑक्टो. रोजी अतिवृष्टी होऊन आठ दिवस झाले तरीही शासनाने आपत्तीग्रस्तांना कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. त्यामुळे शासनाने विलंब न लावता शेतक-यांना व पुरग्रस्तांना 25 हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि. 21) इंदापूर येथे केली.

इंदापूर तालुक्यात चालु पावसाळ्यात आजपर्यंत विक्रमी 275 टक्के (एकुण 1450 मी.मी.) पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, कांदा, कडवळ आदी पिके पुर्णपणे वाया गेली आहेत. फळबागा व ऊस पिकांचेही मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. अजुनही शेतात पाणी आहे. त्यामुळे कधी नव्हे असा शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे तातडीची मदत म्हणून शेतक-यांना आता तात्काळ 25 हजार रू. प्रति हेक्टरी याप्रमाणे आर्थिक मदत शासनाने करावी. त्यानंतर पिकांचे पंचनामे पुर्ण झालेवर फळबांगांना व ऊस पिकांना प्रति हेक्टरी रू. 50 हजार निकषाप्रमाणे उर्वरित देय रक्कम रू. 25 हजारची आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमुद केले.

ते पुढे म्हणाले, नीरा व भिमा नदीला पुर आल्याने तसेच गावोगावच्या ओढयांचे रूपांतर नदीत झाल्याने अनेक घरांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे अशा पुरग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत म्हणून रू. 25 हजाराची मदत द्यावी. घरांचे पंचनामे झाल्यानंतर कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे नुकसानीच्या प्रमाणात रू. 1 लाख, रू. 2 लाख याप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम अदा करावी. गावोगावची तसेच इंदापूर शहरातील दुकाने तसेच हॉस्पिटल्समधील उपकरणे यांचे नुकसान झाल्याने त्यांनाही आर्थिक सहाय्य करण्यात यावे. शासनाने नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, एकही शेतकरी अथवा नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहू नये.

तसेच नीरा व भिमा नदीवरील बहुतेक बंधा-यांचे पुराने दोन्ही बाजूकडील भराव वाहून जाणे, ढापे वाकडे होणे, भिंतींना चिरा जाणे आदी प्रकारचे नुकसान झाले आहे. दि.15 ऑक्टो. पासून बंधा-यांमध्ये पाणी अडविले जाते. त्यामुळे हानी झालेल्या बंधा-यांची तात्काळ दुरूस्ती करून पुर्ण क्षमतेने पाणी अडविणेत यावे. भीमा व नीरा नदीचे पात्र डिसेंबर महिन्यात कोरडे पडते. जर सध्या पाणी अडविले नाही तर मात्र निरा व भिमा नदी काठच्या शेतकऱ्यांची पिके 15 जानेवारीपासून पाण्याअभावी जळुन जाऊन, शेतकरी उध्वस्त होईल, असा स्पष्ट इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.

सध्याच्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांची खरीप व इतर पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. त्यामुळे चालू रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी शेतक-यांना प्रति हेक्टरी रू.15 हजार रूपयांचे अनुदान शासनाने देण्याची गरज आहे, असे मतही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दि.19 रोजी इंदापूर तालुक्याची पुर परिस्थितीची पाहणी केली. ते केंद्र शासनाकडून शेतक-यांना भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र पूरग्रस्तांना मदत करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे बांधकाम खात्याचे मंत्री आहेत, असे असताना त्यांच्या निष्क्रियतेमुळे तालुक्यातील गावोगावच्या रस्त्यांची वाट लागली आहे. तसेच अडचणीतील शेतकरी व नागरीकांना शासनाची तात्काळ मदत मिळवून देणेचे काम हे लोकप्रतिनीधीचे असते, मात्र तालुक्याचे लोकप्रतिनीधी यामध्ये निष्क्रिय व अपयशी ठरले आहेत, अशी टिका यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली.

सोलापुरात चेक वाटप, मग इंदापूरात का नाही? – हर्षवर्धन पाटील

इंदापूरचे लोकप्रतिनिधी हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तिथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अतिवृष्टीने घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाच्या वतीने चेकचे वाटप करण्यात आले. आपले लोकप्रतिनिधी सोलापूर येथे शासनाची तात्काळ मदत म्हणून जनतेला चेक वाटतात, मात्र इंदापूर तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडत आहेत. तसेच सोलापूरच्या तुलनेत इंदापुरात जास्त नुकसान झाले आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी इंदापूर तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करणे गरजेचे होते, असे स्पष्ट मतही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा