श्रीनगर, ५ ऑक्टोंबर २०२२: जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील द्रास भागात मंगळवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. घेराव घातल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावर सुरक्षा दल दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. हे तीन दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय मुलू येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये देखील चकमक सुरू झाली असून या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला आहे.
#UPDATE | Killed terrorists Hanan Bin Yaqoob & Jamshed were involved in the recent killing of SPO Javed Dar on Oct 2 at Pinglana in Pulwama & an outside labourer from West Bengal on Sep 24 in Pulwama: ADGP Kashmir Vijay Kumar
— ANI (@ANI) October 5, 2022
या चकमकीची माहिती काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट करत दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना ADGP काश्मीर यांनी सांगितले की, द्रास, शोपियान येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. हे तिन्ही दहशतवादी स्थानिक असून ते जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे अजूनही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
ठार करण्यात आलेले दोन दहशतवादी हनान बिन याकूब आणि जमशेद हे एसपीओ जावेद दार आणि पश्चिम बंगालमधील एका मजुराच्या हत्येत सामील होते. २ ऑक्टोबरला दहशतवाद्यांनी एसपीओची हत्या केली होती. याशिवाय २४ सप्टेंबर रोजी दहशतवाद्यांनी बंगालमधील एका मजुराची हत्या केली होती, अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.