बंगळुरू, ५ डिसेंबर २०२२ : सुप्रसिद्ध गायक लकी अली यांनी त्यांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण होत असल्याची पोस्ट शेअर केली आहे. बंगळुरूमधील भूमाफिया त्यांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण करीत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. सुधीर रेड्डी नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या ‘आयएएस’ अधिकारी असलेल्या पत्नीच्या मदतीने हे अतिक्रमण केले आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
पोस्टमध्ये लकी अली लिहितात, ‘मी सध्या कामानिमित्त दुबईत आहे. केंचेनाहल्ली येलाहंका येथील ट्रस्ट प्रॉपर्टी असलेल्या माझ्या शेतावर बंगळुरू येथील भूमाफिया सुधीर रेड्डीने बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे. रोहिणी सिंधुरी नावाच्या आयएएस अधिकारी असलेल्या पत्नीच्या मदतीने ते आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी राज्य संसाधनांचा दुरुपयोग करीत आहेत. ते बळजबरीने आणि बेकायदेशीरपणे माझ्या शेतात येत आहेत आणि संबंधित कागदपत्रे दाखवण्यास नकार देत आहेत. गेल्या ५० वर्षांपासून मी तिथे राहतो आहे.’
स्थानिक पोलिसांकडून कोणतीही मदत मिळत नाही, जे अतिक्रमण करणार्यांचे समर्थन करीत आहेत आणि त्याबद्दल मी उदासीन आहे. माझे कुटुंब आणि लहान मुले शेतात एकटे आहेत, असेही त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे. कायदेशीर बाबींचा विचार केला असता, कोणत्याही कागदपत्रांशिवाय असे अतिक्रमण करणे बेकायदेशीर आहे. सात डिसेंबरला होणाऱ्या कोर्टातील सुनावणीच्या आधीच अशा पद्धतीने केले जाणारे अतिक्रमण रोखण्यात यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा मदत न मिळाल्याने मी ही पोस्ट टाकत आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. तर लकी अली यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत, लकी अली यांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांच्या चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये केली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे