महाराष्ट्रात बीआरएस पक्षाचा प्रवेश, पक्षप्रमुख के चंद्रशेखर राव म्हणाले- अब कि बार किसान सरकार

नागपूर १६ जून २०२३: तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी, ‘भारत राष्ट्र समिती’ पक्षाच्या कार्यालयाचे नागपुरात उद्घाटन केले. लवकरच औरंगाबाद, पुणे आणि मुंबई येथे कार्यालये सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. केसीआर म्हणाले की, देशात बदल घडवण्यासाठी महाराष्ट्रच कारणीभूत ठरेल. महाराष्ट्रात आम्ही शेतकऱ्यांचे सरकार बनवू.महाराष्ट्रातील बीआरएस पक्ष समित्यांमध्ये चार लाख लोक सामील झाले आहेत. महाराष्ट्रासोबतच देशात बदल घडवून आणणे हे त्यांचे ध्येय असल्याचे केसीआर म्हणाले.

केसीआर म्हणाले की, अमेरिकेत शेतकर्‍याला सर्वाधिक सबसिडी मिळते, पण भारतात शेतकर्‍यांना पुरेसे अनुदान नाही. यामुळेच भारतात सर्वाधिक आत्महत्या शेतकरी करतात. सिंगापूरमध्ये काहीही नाही, फक्त मनाची शक्ती आहे. मग सिंगापूरची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा खूप पुढे कशी, आपण पुढे कधी जाणार आणि इतर देशांशी स्पर्धा कधी करणार? भारतात यापूर्वी कधीही अशी घसरण झाली नव्हती. देशात तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, पण सरकार मधिल नेते त्यावर चर्चा करत नाहीत. आता महाराष्ट्रात बीआरएस पक्ष वेगाने उदयास येत आहे, बीआरएस पक्षाचे चार लाख सदस्य तयार झाले आहेत..

महाराष्ट्रात प्रत्येक पक्षाला सत्ता मिळाली, पण कोणीही बदल घडवून आणला नाही. भारतात बदल घडवून आणणे हे बीआरएस पक्षाचे ध्येय आहे. बदललेला भारत हाच आजच्या भारताच्या सर्व समस्यांवर उपाय आहे. महाराष्ट्र सरकारचे बजेट सहा लाख कोटी रुपये आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याचे बजेट दहा लाख कोटी रुपये असावे, यावर चर्चा व्हायला हवी. केसीआर म्हणाले की, पाणीपुरवठा पुरेसा असावा, देशातील शेतकरी सोन्याच्या विटा मागत नाहीत, ते पुरेसे पाणी आणि पुरेशी वीज मागत आहेत, ते त्यांच्या अन्नधान्याची किंमत मागतायत, आता देशाच्या जलनीतीचा आढावा घ्यावा लागेल, असे केसीआर म्हणाले.

आपल्या देशात ८३ कोटी एकर जमीन आहे, त्यातील ४१ कोटी एकर शेतीयोग्य आहे. भारतात प्रत्येक एकराला पाणी दिले जाऊ शकते, प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते. देशातील प्रत्येक तालुक्यात अन्न प्रक्रिया उद्योग उभारले जावेत, यातून तरुणांना रोजगार मिळेल. भारतातून जगभरात खाद्यपदार्थ पाठवता येतील. तेलंगणा सरकारने आतापर्यंत पन्नास हजार दलित कुटुंबांना रोजगारासाठी दहा लाख रुपये दिले आहेत. आता दलित बंधू योजनेंतर्गत सतरा हजार कोटींची रक्कम वितरित केली जाणार आहे. बीआरएसचे सरचिटणीस के केशव राव, खासदार संतोष कुमार, आमदार बालका सुमन, माणिक कदम आणि इतर नेते नागपूर कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा