मुंबई, १ ऑक्टोबर २०२३ : मुंबईत स्वत:ची गाडी घेऊन येणे आता महागले आहे.मुंबईत टोलनाक्यावर दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ ५ रुपयांपासून ते ३० रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत प्रवेश करणेही महागले आहे. आजपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. मुंबईच्या पाचही एन्ट्री टोलनाक्यावर अधिकचे पैसे भरल्यानंतरच प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे आता या टोल दरवाढीविरोधात प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहावे लागणार आहे.
एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने ही टोल दरात वाढ केली आहे. टोल दरात वाढ झाल्यानंतर आजपासून मुंबई आणि उपनगरात ये-जा करणाऱ्या वाहनांना टोलसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत तर दुसरीकडे या टोल दरवाढीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. टोल दरवाढ झाल्यामुळे मुंबईच्या एन्ट्री पॉइंट असलेल्या वाशी, मुलुंड पूर्व, मुलुंड पश्चिम, ऐरोली आणि दहिसर टोल नाक्यावर ज्यादा पैसे देऊनच मुंबईत प्रवेश करवा लागणार आहे.
या आधी चारचाकी वाहनांना ४० रुपये टोल आकारला जात होता. पण आजपासून हाच टोल ४५ रुपये आकारला जाणार आहे. पाचही टोल नाक्यांवर मिनी बससाठी ६५ रुपये टोल आकारला जात होता. पण आता हाच टोल ७५ रुपये इतका आकारण्यात येणार आहे. ट्रकसाठी सध्या १३० रुपये टोल आकारला जात होता. पण आजपासून १५० रुपये टोल आकारला जाणार आहे. अवजड वाहनांसाठी कालपर्यंत १६० रुपये टोल आकारला जात होता. परंतु आजपासून हेच दर १९० रुपयांवर जावून पोहोचणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर