जम्मू काश्मीर, २३ जानेवारी २०२२: देशाच्या उत्तरी भागात जम्मू काश्मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने चक्क मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापित केली आहे. ही प्रतिकृती १४ हजार ८०० फूट उंचावर स्थापित करण्यात आली असून जगात प्रथमच महाराजांची प्रतिकृती इतक्या उंचावर बसविण्यात आली आहे.
मच्छल या गावात सैन्यदलाच्या वतीने महाराजांच्या दोन प्रतिकृत्या स्थापित करण्यात आल्या आहेत. या दोन्ही प्रतिकृती पुण्यातील २५ वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारल्या आहेत. मच्छल बटालियनचे कर्नल प्रणय पवार यांच्या कल्पनेतून ही प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या मूर्तीच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमधील नागरिकांना देखील शिवाजी महाराजांची माहिती मिळत आहे.
मच्छल बटालियनच्या वतीने शिवरायांची एक मूर्ती नियंत्रण रेषेजवळ तर दुसरी मूर्ती मच्छल गावात तयार करण्यात आलेल्या ‘मराठा स्मृतिस्थळ’ येथे बसविण्यात आली आहे.
प्रत्येक मूर्ती साकारण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागला. यासाठी विशिष्ट प्रकारच्या फायबरचा वापर करण्यात आले आहे. त्यामुळे ऊन, पाऊस किंवा बर्फवृष्टी झाल्यावरही मूर्तीवर काही परिणाम होत नाही असे मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी सांगितले.
हुतात्मा जवानांच्या स्मरणार्थ मराठा लाईट इन्फॅन्ट्रीच्या ५६ राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी या स्मृतीस्थळाची निर्मिती केली आहे. या स्मृतीस्थळात एक भिंत उभारण्यात आली आहे. देशासाठी कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या ३२ जवानांची नावे त्या भिंतीवर कोरण्यात आली आहेत. यामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांचा इतिहास कायम सर्वसामान्यांपर्यंत पोहचत राहील, असेही कर्नल पवार यांनी सांगितले.
गेल्या १४ वर्षांपासून मराठा रेजिमेंट काश्मीर खोऱ्यात सीमेवर तैनात आहे. शत्रूशी लढणाऱ्या या जवानांना महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये दररोज मिळत राहावे या अनुषंगाने मच्छल येथे शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापित करण्याची कल्पना सुचली.
मराठा समाजाला एकत्र करत स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. शिवाजी महाराजांनी शत्रूला आपल्या युद्धनीती आणि धाडसी कर्तृत्वाने पळवून लावले. त्यांच्या मावळ्यांची फौजेप्रमाणे आज लष्कराचे सैन्य देखील सीमेवर शत्रूशी लढत आहे. शिवाजी महाराज हे प्रेरणेचे केंद्र आहेत असे कर्नल पवार यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी