मुंबई: मुंबईतील पूर्व द्रूतगती मार्गाला (इस्टर्न फ्री वे) माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार असून त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नगरविकास विभागाला देण्यात आल्या.
अजित पवारांनी यासंदर्भात ट्विट केले होते. आता या ट्विटला प्रतिसाद देत विलासराव देशमुखांचे सुपूत्र आणि अभिनेते रितेश देशमुखने अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
मुंबईतल्या ‘इस्टर्न फ्री वे’ ला माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात येईल. त्यासंदर्भातील सूचना नगरविकास विभागाला दिल्या. याबाबत परिवहन विभागासोबतच्या बैठकीत राज्यातली परिवहन सेवा सुधारण्याबाबत चर्चा केली.
यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. असे ट्विट अजित पवारांनी केले होते. या ट्विटला रितेश देशमुखने प्रतिसाद देत आभार मानले आहे. श्री विलासराव देशमुखजींनी केलेल्या कामाला आज तुम्ही मान दिला. त्याबद्दल – मुलगा म्हणून मी सदैव आपला आभारी राहीन. असे ट्विट रितेश देशमुखांनी केले.