पुणे, २० जुलै २०२२: -जंगले जळत आहेत…लोक मरत आहेत…विमानतळाच्या धावपट्ट्या वितळत आहेत…रस्त्यांवरचे डांबर वितळले आहे…इतकंच नाही तर गवतही जळतंय…रस्त्यांवर शांतता, जणू लॉकडाऊन पुन्हा लादले गेले.. सध्या युरोपची ही स्थिती आहे. संपूर्ण युरोप उष्णतेशी झुंज देत आहे. ब्रिटनच्या इतिहासात पहिल्यांदाच पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. याआधी, शेवटचे सर्वोच्च तापमान २०१९ मध्ये ३९.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. स्पेन-पोर्तुगालमध्ये उष्णतेमुळे हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
ब्रिटनमध्ये उष्णता किती वाईट आहे? कठोर शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हाऊस ऑफ कॉमन्सने (संसद) सदस्यांना त्यांच्या सोयीनुसार कपडे घालण्याची परवानगी दिली आहे, हे अशा प्रकारे समजू शकते. हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष लिंडसे हॉयल यांनी सांगितले की, जर खासदारांना या वाढत्या उष्णतेमध्ये टाय-सूट घालायचे नसतील तर तसं ते करू शकतात.
रस्ते वितळले, रुळ पसरले, रनवे वितळले
ब्रिटनमध्ये उष्णतेमुळे परिस्थिती बिकट झाली असून, त्यामुळे तेथील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. वृत्तसंस्थेनुसार, ब्रिटनमधील रस्त्यांवर डांबर वितळण्यास सुरुवात झाली आहे. ल्युटन विमानतळाची धावपट्टीही वितळली. त्याचबरोबर रेल्वे रुळांवरही वाढत्या तापमानाचा तडाखा बसत असल्याने ते पसरत आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
इंग्लंडमधील लोकांना रेल्वेने प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परिवहन मंत्री ग्रँट शॅप्स म्हणाले की, यूकेचे रेल्वे नेटवर्क या उष्णतेचा सामना करू शकत नाही. अपग्रेड व्हायला वर्षे लागतील. त्यांनी सांगितले की जेव्हा पारा ४० अंश सेल्सिअस असतो तेव्हा ट्रॅकचे तापमान ५० अंश, ६० अंश आणि अगदी ७० अंशांपर्यंत पोहोचते. त्यामुळे रुळ वितळू शकतात आणि ट्रेन रुळावरून घसरण्याचा धोका वाढतो.
तापत आहे युरोप
केवळ ब्रिटनच नाही तर फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन, ग्रीससह संपूर्ण युरोपीय देश जळत आहेत. लोक घरातून बाहेर पडत नाहीत. रस्त्यावर शांतता आहे. बहुतेक लोक घरून काम करत आहेत. कुणी ऑफिसला जात असेल, तर तिथे एसी मिळेल. बहुतांश भागात पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. एक-दोन दिवसात पारा ४१ अंशांच्या पुढे जाईल, असा इशारा इंग्लंडच्या हवामान विभागाने दिला आहे. वाढत्या उन्हामुळे जंगलात आग लागण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. दक्षिण युरोपच्या काही भागांमध्ये, तापमान आता किंचित कमी होत आहे, परंतु शेकडो जंगले अजूनही जळत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हजारो अग्निशमन दलाचे जवान येथे कार्यरत आहेत. अधिक जंगलांमध्येही आग लागण्याचा धोका असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कार्लोस III हेल्थ इन्स्टिट्यूटनुसार, स्पेनमध्ये सलग ८ दिवसांपासून उष्णतेची लाट सुरू आहे. आतापर्यंत येथे ५१० लोकांचा मृत्यू झाला आहे. यंदा आगीमुळे १.७३ लाख एकर जमीन खाक झाली आहे. पोर्तुगालमध्ये तर परिस्थिती बिकट झाली आहे. येथेही ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनधी: ईश्वर वाघमारे