मकर संक्रांतीपूर्वीच तिळगुळाच्या गोडव्यावर महागाईची ‘संक्रांत’!

निगडी, १० जानेवारी २०२३ : मकर संक्रांत सण अवघ्या चार-पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणाला तिळाच्या पदार्थांचे खूप महत्त्व आहे. बाजारपेठेत सध्या तीळ आणि तिळापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे दर वाढत असल्याचे चित्र आहे. सध्या तिळाचे भाव किरकोळ बाजारात २०० रुपये किलो आहेत. काही महिन्यांपूर्वी १५० ते १६० रुपये प्रतिकिलोने विकल्या जाणाऱ्या तिळाचे दर संक्रांतीनिमित्त वाढत असल्याचे दिसत आहे.

तीळ दरवाढीच्या मागचे प्रमुख कारण म्हणजे मागील काही वर्षांपासून सातत्याने कमी होत चाललेली पेरणी, १० वर्षांपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये काही ना काही प्रमाणावर तिळाची पेरणी असायची. मात्र, सध्या ही परिस्थिती गंभीर बनली आहे. जिल्ह्यात उत्पादन कमी असल्यामुळे ग्राहकांना याचा मोठा फटका बसत आहे.

मागील काही वर्षांमध्ये सातत्याने होत असलेल्या वातावरण बदलाचा तिळाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. उत्पादनात घट आल्याने तिळाचे भाव सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे मकर संक्रांतीला तिळाची मोठी मागणी लक्षात घेता व्यापाऱ्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचीही चर्चा बाजारपेठेत आहे.

मकर संक्रांतीला सूर्याचे उत्तरायण सुरू होते. हा काळ थंडीचा असल्याने तीळ आणि गूळ यांच्यापासून बनविलेली चिक्की व लाडू सेवन केल्यास शरीराला अपेक्षित ऊर्जा तर त्वचेला टवटवीतपणा मिळतो. यामुळेच या दिवशी आवर्जून तिळगूळ वाटला जातो. काटेरी हलव्याचे दागिने महिला परिधान करतात. यामुळे घरोघरी तिळगूळ खरेदी करून गृहिणी तिळगूळ बनवीत असतात.

मकर संक्रांतीपूर्वीच तिळाच्या दरात काही अंशी वाढ झाली आहे. ठोक बाजारपेठेत तिळाचे दर वधारलेले असल्यानेच किरकोळ बाजारातही तीळ महागला आहे.
– संजयकुमार चिंचोले, किराणा व्यावसायिक, शाहूनगर.

मकर संक्रांत आणि तिळाचं नातं खूपच महत्त्वाचं आहे. सफेद, काळे आणि चॉकलेटी रंगाचे तीळ हे आपल्या जेवणाच्या वापरात असतातच. तिळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. विविध रोगांपासून दूर राहण्यासाठी तिळाचा वापर करून घेता येतो. इतकंच नाही, तर तिळाच्या तेलाने त्वचा आणि केसांनाही फायदा मिळतो. तीळ खाल्ल्याने शरीरामध्ये उर्जा निर्माण होते आणि थंडीपासूनही संरक्षण होते. याच कारणासाठी मकर संक्रांतीच्या सणाला तिळाचे लाडू केले जातात आणि वाटण्यात येतात. यामध्ये पौष्टिक तत्त्व असतात. तिळाचे आरोग्यदायी फायदे असतात.

  • डाॅ. नूतनकुमार सी. पाटणी, निगडी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा