आजच्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवले तरी अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत : सुनील महाडिक

पुरंदर दि.२१ नोव्हेंबर २०२० : छत्रपती शिवाजी महाराज अनंत कालपर्यंत समाजाला प्रेरणा देणार आहेत. बालपणापासूनच छत्रपती शिवाजी राजांचे चरित्र शिकवले तर आज समाजात घडणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटना पूर्णपणे बंद होतील.असे प्रतिपादन जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे. ते पिंगोरी येथे किल्ले स्पर्धा बक्षीस वाटप व कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये घ्यावयाची काळजी या कार्यक्रमात बोलत होते.

सैनिकांचे गाव असलेल्या पिंगोरी गावात सुट्टीसाठी आलेले जवान व गावातील तरुणांनी किल्ले स्पर्धेचे आयोजन केले होते.कोरोनामुळे आलेली मरगळ झटकून. लोकांमध्ये चैतन्य व उत्साह निर्माण व्हावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार,भारतीय सैन्यात असलेले जवान विशाल गायकड व त्यांच्या मित्र मंडळाच्यावतीने या किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये लहान मोठ्या गटातील ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला.या स्पर्धेचे बक्षीस वितरण पोलिस निरीक्षक सुनील महाडीक व पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे ‌यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे, कांताराम शिंदे,पोपट शिंदे, वसंत शिंदे, अमोल शिंदे, विशाल गायकवाड,आदी मान्यवरांबरोबर तरूण मुले व ग्रामस्थ उपस्थित होते.
या स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक संग्राम विशाल गायकवाड याला द्वितीय क्रमांक रमेश शिंदे तृतीय क्रमांक मयुरेश रुपेश शिंदे तर चतुर्थ क्रमांक क्षितिज निनाद शिंदे याला मिळाला. मोठ्या गटात प्रथम क्रमांक विजय व गौरी नवनाथ यादव या बंधु आणि भगिनींने मिळवला.द्वितीय क्रमांक मयुर गायकवाड, तृतीय क्रमांक ओंकार सुतार, ओंकार महेश भोईटे व आर्या शिंदे यांना देण्यात आला. चतुर्थ क्रमांक दिनेश भोसले व ओंकार शिंदे यांना विभागुन देण्यात आला.

यावेळी महाडिक यांनी छत्रपातींच्या जीवन कार्याची व त्यांनी जोपासलेल्या निती मूल्यांची माहिती तरुणांना दिली. ते म्हणाले की,’पराभूत झालेल्या सरदाराची सून राजापुढे आणल्यानंतर जो राजा तिच्याकडे आई म्हणून पाहतो व आमची आई जर एवढी सुंदर असती तर आम्ही ही सुंदर जन्मलो असतो असे म्हणत चोळी बांगडी देऊन तिचा सन्मान करतो तो राज किती महान असला पाहिजे ! जगात अनेक राजे होऊन गेले, पण पराभूत झालेल्यांना कोणीच सन्मानाने वागवले नाही.त्यांच्या स्त्रियांच्या अब्रु लुटल्या.पण जगाच्या पाठीवर छ.शिवाजी महाराज असे राजे झाले ज्यांनी शत्रूच्या स्त्रीचा सुध्दा सन्मान केला.शिवाजी राजांचा हा गुण व त्यांचा हा इतिहास लोकांना शिकवला तो लोकांनी अंगिकारला तर जगात कोणत्याच महिलेवर अत्याचार होणार नाही. पिंगोरीतील तरुणांनी किल्ला स्पर्धेच्या माध्यमातून राजांच्या इतिहास पुन्हा जागृत केला आहे.आता तुम्ही राजांच्या आदर्श मार्गावर चाला असे आवाहन त्यांनी केले.त्याच बरोबर पुढे कोरोनाची दुसरी लाट येत आहे.लोकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी कोरोनाच्या येऊ घातलेल्या दुसऱ्या लाटेत कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिनेअभिनेता विनोद शिंदे यांनी केले तर आभार प्रकाश शिंदे यांनी मानले.

न्युज अनकट प्रतिनिधी राहुल शिंदे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा