जेनेवा, ६ ऑक्टोंबर २०२०: डब्ल्यू एच ओ म्हणजेच विश्व आरोग्य संस्थेनं सोमवार दिलेल्या आपल्या एका विधानात सांगितलं की, जगात प्रत्येक दहा व्यक्तींपैकी एक व्यक्ती कोरोनाव्हायरस’नं संक्रमित आहे. डब्ल्यूएचओ’नं सांगितलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर पूर्ण जगात सध्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींची जी संख्या आहे, त्यापेक्षा वास्तविक २० पट लोकं कोरोनाव्हायरस संक्रमित झालेली आहेत.
यासह डब्ल्यूएचओ’नं कोरोना विषयक परिस्थिती भविष्यात आणखी भयावह होण्याची चेतावणी दिली आहे. डब्ल्यूएचओ’च्या आपत्कालीन कार्यक्रमांचे प्रमुख डॉ. मायकेल रायन म्हणाले, ‘हे आकडे ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत वेगवेगळे असू शकतात. वेगवेगळ्या वयोगटातील असू शकतात. परंतु याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जगातील बहुसंख्य लोकसंख्या या धोक्यात आली आहे.
कोरोना संक्रमणासंदर्भात आयोजित ३४-सदस्यांच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ते म्हणाले की, “साथीच्या रोगाचा प्रसार अजूनही सुरू आहे. तथापि, संक्रमण पसरण्यापासून थांबवणं व त्यापासून जीव वाचवण्यासाठी अनेक पर्याय देखील उपलब्ध आहेत. आत्तापर्यंत या संसर्गापासून अनेक लोकांचे जीव वाचविण्यात आले आहेत आणि भविष्यात देखील वाचवता येऊ शकतात.”
डॉ. रायन म्हणाले की, ‘दक्षिण-पूर्व आशियामधील कोरोना विषाणूमुळं परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. युरोप आणि पश्चिम भू-मध्य समुद्रात मृत्यूचं प्रमाण खूप जास्त असल्याचं दिसून आलंय. तर आफ्रिका आणि वेस्टर्न पॅसिफिक देशांमध्ये परिस्थिती अधिक सकारात्मक होती.’
डॉ. रायन म्हणाले, ” आमच्या ताज्या अंदाजानुसार जगातील १० टक्के लोक कोरोना व्हायरस’नं संसर्गित झाले आहेत. म्हणजेच, जगातील सुमारे ७६० कोटी लोकसंख्येपैकी ७६ कोटी लोकांना कोरोना विषाणूची लागण होऊ शकते. डब्ल्यूएचओ आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठानं दिलेला आकडेवारी पेक्षाही ही संख्या जास्त असू शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे